नागपूर - नागपुरात गुरुवारी (5 जुलै) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे विधानभवनातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. नागपुरात पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वीच वीजपुरवठा खंडीत झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
विधान भवनाच्या तळघरात पाणी साचल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे आजचे कामकाज बंद ठेवण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत सडकून टीका केली आहे. तर दुसरीकडे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजपुरवठा खंडीत झाला नसून तात्पुरता बंद करण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिले आहे.
- विरोधकांनी मोबाइलच्या फ्लॅश लाईटचा आधार घेत विविध मागण्यांसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अंधारातच बैठका घेत दिवसभराची रणनीती आखली.
- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारचा हट्टीपणा या गोंधळाला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.