लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवामान खात्याने ७ सप्टेंबरला नागपुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ७ सप्टेंबरला नागपुरात होणारा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा दौरा पुढे ढकलल्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली.त्यामुळे महामेट्रोच्या हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या अॅक्वा लाईनचे लोकार्पण पुढे ढकलल्यात आल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे. याशिवाय कोराडी रोडवरील मानकापूर इंडोर क्रीडा स्टेडियम येथे राष्ट्रीय महामार्ग-५४७ई वरील सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर मार्गाचे चौपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग-३५३डी च्या नागपूर-उमरेड चौपदरीकरणाचे उद्घाटनही पुढे ढकलण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ वाढली होती. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) उपराजधानीत दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पोलिसांच्या तैनातीसह सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली होती आणि काही दिशानिर्देश जारी करण्यात आले होते. पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलल्यात आल्याच्या वृत्ताने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महामेट्रोच्या हिंगणा मार्गाचे लोकार्पण करताना पंतप्रधान महामेट्रोतर्फे आयोजित प्रदर्शन आणि मेट्रोमधून सुभाषनगर ते इंटरचेंज सीताबर्डी स्टेशनपर्यंत प्रवास करणार होते. हा क्षण आमच्यासह अविस्मरणीय ठरणारा होता. सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनीही या मार्गाची पाहणी करून ५ सप्टेंबरला प्रमाणपत्र जारी केले होते. पंतप्रधानांतर्फे करण्यात येणारा मेट्रोचा प्रवास नागपूरच्या विकासावर शिक्कामोर्तब ठरणार होता. दौरा पुढे ढकलल्यामुळे सर्वांच्या उत्साहावर विरजन पडले आहे. पण पंतप्रधान पुढे येण्याच्या वृत्ताने अजूनही उत्साह कायम आहे.पंतप्रधान औरंगाबाद येथून दुपारी ४.२० वाजता नागपुरात येणार होते. वेधशाळेने बंगालच्या आणि अरबी या दोन्ही समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ६ आणि ७ सप्टेंबरला मुंबई, ठाणे, चंद्रपूर, या भागात मध्यम स्वरुपाचा (जवळपास १०० मिमि) आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार (जवळपास २०० मिमि) पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यापैकी नागपूर, अमरावती, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव, अकोला व गडचिरोली या भागात अतिमुसळधार (जवळपास ३०० मिमि) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अतिमुसळधार पावसामुळे पंतप्रधानाचा दौरा पुढे ढकलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 8:06 PM
हवामान खात्याने ७ सप्टेंबरला नागपुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ७ सप्टेंबरला नागपुरात होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुढे ढकलल्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली.
ठळक मुद्दे विविध प्रकल्पाचे उद्घाटन लांबले : तारीख निश्चित नाही