लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महासंचालक व पोलीस महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेले हेमंत नगराळे हे विदर्भाचे सुपुत्र असून त्यांच्यामुळे विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) पदाची जबाबदारी होती. यापुढे ते महासंचालक व पोलीस महानिरीक्षक पदाचाही कार्यभार पाहणार आहेत.
नगराळे यांचे इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे तर, त्यापुढील शालेय शिक्षण नागपूरमधील पटवर्धन शाळेत झाले. त्यांनी तत्कालीन व्हीआरसीईमधून बी. ई. (मेकॅनिकल) पदवी प्राप्त केली. मुंबईतील जेबीआयएमएस येथून मास्टर इन फायनान्स मॅनेजमेन्ट पदवी घेतली. पोलीस विभागात नियुक्ती मिळविल्यानंतर त्यांना सुरुवातीलाच नक्षलग्रस्त राजुरा (जि. चंद्रपूर) येथे एएसपी म्हणून पाठविण्यात आले. १९९२ मध्ये ते सोलापूरचे डीसीपी झाले. दरम्यान, त्यांच्या प्रयत्नामुळे सोलापूरमध्ये आयुक्तालय स्थापन करण्यात आले. तसेच, त्यांनी बाबरी मशीद प्रकरणामुळे उफाळलेला धार्मिक दंगा सक्षमपणे नियंत्रणात आणला. रत्नागिरी येथे पोलीस अधीक्षक असताना त्यांनी एनरॉन प्रकल्पाशी संबंधित जमीन संपादनाची प्रकरणे प्रभावीपणे हाताळली. १९९६ ते १९९८ पर्यंत सीआयडी पोलीस अधीक्षक असताना त्यांनी राज्यव्यापी एमपीएससी पेपर फूट प्रकरणाचा तपास केला. तसेच, लहान मुलांचे अपहरण करून त्यांचा खून करणाऱ्या अंजनाबाई गावितला फाशीची शिक्षा मिळवून दिली. त्यांनी सीबीआयकरिताही यशस्वीपणे कार्य केले. तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याच्या चौकशीमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांना महासंचालक श्रेणीत बढती मिळाली. आतापर्यंत त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक व अंतर्गत सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्याकडे महासंचालक व पोलीस महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्यामुळे विदर्भात आनंद व्यक्त केला जात आहे.