लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य भारताची कुबेरनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतवारी बाजारपेठेत रस्त्यांची मात्र वाणवा आहे. निमुळत्या छोट्या गल्ल्या, लहान-लहान वळण, होलसेलपासून ते किरकोळ वस्तू विक्रीची सर्वच प्रकारची दुकाने, स्ट्रीट फूड आणि फेरिवाल्यांचा राबता आणि ग्राहकांची कधीही कमी न होणारी गर्दी, असे या बाजारपेठेचे स्वरूप आहे. सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील चंद्रशेखर आजाद चौकापासून ते इतवारी रेल्वे स्टेशनचा उड्डाणपूल, जागनाथ बुधवारी येथील भारतमाता चौक, नंगा पुतळा, सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील भावसार चौक, गांधीपुतळा ते पुन्हा चंद्रशेखर आजाद चौक अशी चौकट म्हणजे इतवारी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या एवढ्या मोठ्या गजबजलेल्या मार्केटमध्ये मात्र, वाहनांच्या पार्किंगला शोधूनही जागा सापडत नाही. दुकानांपुढे रस्त्याच्या कडेलाच दुकान मालक म्हणा वा ग्राहक सगळ्यांची वाहने लागलेली असतात. त्यामुळे, येथे ट्रॅफिक जाम ही दररोजचीच समस्या आहे.
चारचाकी घेऊन येणे त्रासदायकच
इतवारी मार्केटमध्ये कुटुंबीयांसोबत चारचाकीने येऊन खरेदी करण्याचा मानस ज्यांचा कुणाचा असेल, त्यांना गाडी ठेवण्यासाठी जी कसरत करावी लागते ती फारच त्रासदायक आहे. चारचाकीतून उतरले की वाहन ठेवण्याचा प्रश्न कधीच सुटत नाही. तुमच्या एकूण खरेदी व्यवहाराच्या चारपट वेळ वाहनाच्या पार्किंगसाठी जागा शोधण्यातच जातो.
दुकानदार अन् ग्राहकांपुढे वाहने ठेवण्याचा प्रश्न
निकालस मंदिर, शहिद चौक, खुळे चौक, लाल इमली गल्ली, सराफा ओळ, किराणा ओळ, चुना ओळ अशा अनेक व्यवसायाची ओळ असणाऱ्या लहान-लहान गल्ल्या येथे आहेत. ग्राहक फार दूरची गोष्ट, ज्यांची दुकाने आहेत, त्यांनाही वाहन पार्क कुठे करायची, हा प्रश्न आहे. हे कोडे अद्याप सुटलेले नाही.
पार्किंग प्लाझाचा प्रस्ताव रखडलेला
सराफा ओळ येथे असलेल्या कारागीरांच्या व्यावसायिक इमारतीच्या जागेवर काही वर्षापूर्वी भव्य अशा पार्किंग प्लाझाचा प्रस्ताव होता. येथील व्यापारी याबाबत सातत्याने बोलत होते. मात्र, काळाच्या ओघात हा प्रस्ताव चर्चेतूनच गायब झाल्याचे दिसून येते.
स्थानिक नागरिकांना मोठी समस्या
इतवारी बाजारपेठ ही जशी व्यापाऱ्याची ओळख आहे, तसेच येथे नागरी वस्तीही मोठी आहे. व्यापारपेठेत येणाऱ्या खरेदीदार व विक्रेत्यांच्या वाहनांच्या पार्किंगमुळे स्थानिक नागरिकांचे दररोज खटके उडत असतात. अनेक नागरिकांनी आपली घरे याच समस्येमुळे विकली आहेत तर अनेकांनी विक्रीस काढली आहेत.
मार्केटमध्ये चारचाकी शिरली की गर्दी तुंबते
मार्केटमध्ये चारचाकी शिरली की बाजारात येणाऱ्या चारही बाजूची ट्रॅफिक तुंबण्यास सुरुवात होते. ही ट्रॅफिक निस्तरायचा नंतर बराच वेळ जातो. विशेष म्हणजे, ही समस्या सोडविण्यासाठी ट्रॅफिक पोलीस येथे अभावानेच दिसून येते.
..................