इनकमिंगमुळे भविष्यात भाजपाची काँग्रेस होईल :महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 08:50 PM2019-08-17T20:50:50+5:302019-08-17T20:52:18+5:30
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रस पक्षातील मातब्बर नेत्यांच्या भाजपात सुरू असलेल्या इनकमिंगमुळे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही. परिणामी भविष्यात भाजपाची काँग्रेस होईल. अशी शंका पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रस पक्षातील मातब्बर नेत्यांच्या भाजपात सुरू असलेल्या इनकमिंगमुळे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही. परिणामी भविष्यात भाजपाचीकाँग्रेस होईल. अशी शंका पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी व्यक्त केली.
राष्ट्रीय समाज पक्षातर्फे बुधवार बाजार येथील संताजी सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळावा, ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपन कार्यक्रम प्रसंगी जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर झाले आहे. विरोधीपक्ष सक्षम नाही. भाजपा घराणेशाही नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा एनडीएचीच सत्ता येईल. असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला दिलेला शब्द पूर्ण केला. पशुसंवर्धन विभागाचे बजेट आधी १२० कोटीचे होते. आता ते ७ हजार ५०० कोटींवर गेले आहे. विदर्भातील दूध उत्पादन दहा हजार लिटरवरून साडेचार लाखांवर गेले आहे. केंद्रातही स्वतंत्र पशुसंवर्धन विभाग निर्माण करण्यात आला. याचा विचार करता आम्हाला पुन्हा पाच वर्ष संधी मिळेल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. भाजपाकडे राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभेच्या ५७ जागांची मागणी केली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा द्यावी, यात नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदार संघाचा समावेश असल्याचे जानकर यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडयाप्रमाणे विदर्भातही राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२५ ऑगस्टला राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पक्षात सेलीब्रेटी प्रवेश करणार असून अभिनेते संजय दत्त यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती जानकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिली. अध्यक्षस्थानी अॅड. मनोज साबळे होते. मंचावर आमदार सुधाकर देशमुख,खासदार कृपाल तुमाने राजूभाऊ पातकर, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड , श्रद्धा भ्रांताबेकर, अतुल पवार, सुभाष राजपूत, डॉ. स्वर्णिमा दिक्षित, अॅड दिपक सरक, गौतम गुंदेजा , आयोजक लोकेश रसाळ, सह आयोजक माधुरी पालीवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार मोहन मते यांनीही भेट दिली. यावेळी सुधाकर देशमुख, कृपाल तुमाने, आनंद मोहिते आदींनी मार्गदशंने केले. जानकर व मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ट नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.