दोघांना अटक : ३० जानेवारीपर्यंत पीसीआर नागपूर : उपराजधानीतील मटकाकिंग आणि कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ रवींद्र गोविंदराव गावंडे (वय ४०) याच्या हत्येचे खरे कारण वदवून घेण्यात पोलिसांना अद्याप यश मिळाले नाही. अटकेतील मुख्य आरोपी योगेश कुंभारे सावजी आणि त्याच्या एका साथीदाराचा पोलिसांनी कोर्टातून ३० जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला आहे. रविवारी रात्री जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून बाल्याची योगेश सावजी आणि त्याच्या साथीदारांनी निर्दयपणे हत्या केली. आरोपी योगेश कुंभारे-सावजी तुकारामनगर, कळमना येथे राहतो. तो खतरनाक गुन्हेगार असून, कुख्यात गुंड भरत मोहाडीकर याच्या हत्याकांडाचा सूत्रधार आहे. बाल्या आणि योगेश दोघेही सध्या प्रॉपर्टी डीलिंगमध्ये सक्रिय होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांनी तिसऱ्या एका साथीदाराच्या मदतीने एक कोट्यवधींचा भूखंड बळकावला होता. त्याला कागदोपत्री आपल्या नावावर करून तेथे सभागृह उभारण्याची बाल्याची योजना होती तर, या भूखंडाला हडपण्यासाठी योगेशने डावबाजी चालवली होती. दोघांनाही एकमेकांचे हेतू ध्यानात आल्याने त्यांच्यात कटुता निर्माण झाली होती. मात्र दोघेही एकमेकांना मनातून घाबरत असल्याने कुणीच काही बोलून दाखवत नव्हते. या पार्श्वभूमीवर, योगेशने त्याच्या घरी रविवारी एका ओल्या पार्टीचे आयोजन केले. त्यात काही गुंड साथीदारांना आणि बाल्यालासुद्धा बोलावण्यात आले. बाल्या त्याची पत्नी जयश्री आणि मुलीसोबत योगेशच्या घरी पोहचल्याने आरोपींना त्याचा गेम करण्यात अडचण वाटू लागली. त्यामुळे योगेशने त्याची पत्नी पिंकीला जयश्रीसोबत तिच्या घरी जायला सांगितले. त्यानुसार जेवण आटोपून जयश्रीला तिच्या मुलीसह घरी पोहचविण्याचे काम पिंकीने केले आणि ती घरी जाताच इकडे आरोपींनी बाल्यावर घातक शस्त्राचे ६० ते ७० घाव घालून त्याला ठार मारले. त्यानंतर मृतदेह बाजूच्या मैदानात फेकून दिला. कळमन्याचे प्रभारी ठाणेदार राम मोहिते यांनी आरोपी योगेश कुंभारे आणि त्याचा मामा राजकुमार यादव या दोघांना अटक केली. त्यांचा आज कोर्टातून ३० जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला. मात्र हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, भूखंड आणि मटक्याच्या धंद्यातील वादामुळे बाल्या योगेशचा गेम करण्याच्या तयारीत होता, अशीही माहिती पुढे आली असून, या प्रकरणात दोन महिलाही संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.(प्रतिनिधी)
कुख्यात बाल्याच्या हत्येचे कारण अंधारात
By admin | Published: January 25, 2017 2:38 AM