लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी बारावीचा भूगोलाचा पेपर होता. यात १० गुणांच्या एका प्रश्नाचे उत्तर हे नकाशाचा वापर करून सोडविण्यास सांगितले होते. त्यासाठी बोर्डाकडून नकाशा पुरविण्यात येणार होता. पण विद्यार्थ्यांना पेपरच्या दरम्यान नकाशा पुरविण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे १० गुणांचे नुकसान झाले, अशी ओरड पालकांकडून करण्यात आली आहे.एलएडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सई मकरंद कुळकर्णी हिला परीक्षेसाठी डॉ. आंबेडकर महाविद्यालय हे केंद्र मिळाले होते. पेपरमध्ये प्रश्न क्रमांक ६ सोडविताना नकाशाचा वापर करायचा होता. वर्गात जवळपास ४० विद्यार्थी पेपर सोडवित होते. विद्यार्थ्यांनी परीक्षकाला नकाशाची मागणी केली असता दोन ते तीन विद्यार्थ्यांना नकाशा पुरविण्यात आला. उर्वरीत विद्यार्थ्यांना ५ मिनिटात नकाशा पुरविण्यात येईल, असे सांगण्यात आले. काही वेळानंतर नकाशे संपले असे सांगून स्टेन्सिलचा वापर करून नकाशा काढा व प्रश्न सोडवा, असे सांगण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडविला त्या विद्यार्थ्यांचा नकाशा काढण्यातच वेळ गेला. सईच्या बाबतीतही असेच घडले. तिने घरी आल्यावर पालकांना ही बाब सांगितली. दुसऱ्या दिवशी पालक लेखी तक्रार घेऊन आंबेडकर महाविद्यालयातील परीक्षा प्रमुखांना भेटले. पण त्यांनी ही बाब मान्य केली नाही. पालकांनी नंतर एलएडी महाविद्यालयातील शिक्षकांशी संपर्क साधला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य यांनी यासंदर्भात बोर्डाकडे तक्रार केली. भूगोल या विषयात विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने बोर्डाकडून कितपत कारवाई होईल, अशी भीती पालकांना आहे. मुलांचे १० गुणांचे नुकसान झाल्याने चिंता व्यक्त केली आहे.
नकाशा न पुरविल्यामुळे विद्यार्थ्यांचे १० गुणांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:38 PM
मंगळवारी बारावीचा भूगोलाचा पेपर होता. यात १० गुणांच्या एका प्रश्नाचे उत्तर हे नकाशाचा वापर करून सोडविण्यास सांगितले होते. त्यासाठी बोर्डाकडून नकाशा पुरविण्यात येणार होता. पण विद्यार्थ्यांना पेपरच्या दरम्यान नकाशा पुरविण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे १० गुणांचे नुकसान झाले, अशी ओरड पालकांकडून करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपालकांची ओरड : बोर्डाकडे केली तक्रार