लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाग नदी आणि नाल्यांची सफाई एक महिन्यात करण्याचा दावा मनपाने केला होता. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी साफसफाईची मुदत ५ जूनपर्यंत निश्चित केली होती. कामाच्या मुदतीला केवळ तीन दिवस उरले असून, केवळ ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.बांगर यांनी ४८.५० कि़मी. लांबीच्या नाग नदीला १० टप्प्यात विभाजित करून साफसफाईची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांकडे दिली होती. आतापर्यंत ६५ टक्के काम झाल्यामुळे कामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एवढेच नव्हे तर नदीतून काढलेली माती काठावर पडली आहे. थंडगतीने सुरू असलेल्या कामासाठी केवळ कार्यकारी अभियंता दोषी आहेत. कारण दिलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण केलेली नाही. शनिवारी तासभर असलेल्या मुसळधार पावसाने मनपा प्रशासनाची पोलखोल झाली. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. पाणी वाहून जाण्यास मार्ग नव्हता. नाल्यांची सफाई पूर्ण न झाल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली होती. नाग नदी १६.५० कि़मी., पिवळी नदी १६.५० कि़मी. आणि पोहरा नदीच्या १२.२० कि़मी. पात्राची स्वच्छता आणि सफाई करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला होता. नाग नदीला चार, पिवळी आणि पोहरा नदीला तीन भागात विभागले होते. नागनदी आणि पोहरा नदीची सफाई महत्त्वपूर्ण आहे. कारण नागनदी शहरामधून वाहते, तर गेल्यावर्षी पोहरा नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे वर्धा रोडवर पाणी आले होते.
बैठकीत नाराजीसाफसफाईच्या गतिसंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे आणि महापौर नंदा जिचकार यांनी नाराजी व्यक्त केली होती. कोणत्याही स्थितीत १० जूनपर्यंत सफाईचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण सध्या कामाची गती पाहता साफसफाई पूर्ण होणार नाही. या ठिकाणी आहे कामाची गती संथपंचशील चौक ते अशोक चौकदरम्यान कामाची गती संथ आहे. बैद्यनाथ चौकाजवळ नागनदीतून माती काढून मातीचे ढीग काठावर लावण्यात आले आहेत. शनिवारी मुसळधार पावसामुळे बहुतांश माती पुन्हा नदीत वाहून गेली आहे. हा भाग कार्यकारी अभियंता अनिल नागदिवे यांच्या अंतर्गत आहे.अशोक चौक ते केडीके कॉलेजपर्यंतची स्थिती भयावह आहे. अशोक चौकाजवळ जवळपास १०० टिप्पर माती नदीच्या काठावर टाकली आहे. माती दोन आठवड्यापासून तशीच पडून आहे. हा भाग कार्यकारी अभियंता राजेंद्र राहाटे यांच्या अंतर्गत येतो.अंबाझरी ते पंचशील चौकादरम्यान नाग नदीची सफाई मोहीम संथ आहे. या ठिकाणी मान्सूनमध्ये कॅनल रोडवर नदीचे पाणी रस्त्यावर येते. या भागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर यांच्या अंतर्गत आहे.गोरेवाडा ते मानकापूरदरम्यान पिवळी नदीची सफाई योग्य पद्धतीने करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. मानकापूर पुलाजवळ गेल्यावर्षी पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. त्यानंतरही कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक याकडे लक्ष देत नाहीत.सोनेगाव पोलीस स्टेशनजवळ पोहरा नदीवरील पूल अत्यंत संवेदनशील आहे. या ठिकाणी सफाई न झाल्यामुळे गेल्यावर्षी नदीचे पाणी वर्धा रोडवर आले होते. यावर्षीसुद्धा अशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हा भाग कार्यकारी अभियंता अमीन अख्तर यांच्या अंतर्गत येतो.