‘आॅनलाईन’मुळे घोळ, उमेदवाराची निदर्शने
नागपूर : नरेंद्रनगर येथील अग्निशमन दलाजवळील केंद्रावर सकाळच्या सुमारास भलताच घोळ समोर आला. राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ आणि ‘अॅप’वर मतदान केंद्राचे नाव पाहून अनेक मतदार मतदानासाठी पोहोचले. मात्र प्रत्यक्षात केंद्रावरील यादीत त्यांचे नावच नव्हते. प्रभाग ३५ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शैलेंद्र तिवारी यांनादेखील याचा फटका बसला व कित्येक वेळ मतदानच करता आले नाही. परिणामी उपस्थितांनी केंद्रासमोरच धरणे आंदोलन केले.
राज्य निवडणूक आयोगाने यंदा मतदारांसाठी संकेतस्थळ व ‘अॅप’ दोघांवरही तपशील उपलब्ध करून दिला होता. मात्र अनेकांच्या बाबतीत ही ‘आॅनलाईन’ यंत्रणा डोकेदुखीच ठरली. यादीत नावच नसल्यामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला. मोबाईलवर ज्या केंद्राचा पत्ता होता, तेथील यादीमध्ये मतदारांचे नावच नसल्याचे अनेक ठिकाणी चित्र होते.
अधिकारी म्हणाले, ‘अॅप’बाबत माहितीच नाही
यासंदर्भात केंद्र अधिकाºयांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, त्यांनी अगोदर प्रतिक्रिया देण्यासच नकार दिला. मात्र त्यांना अधिकृत प्रवेशपत्र दाखविल्यानंतर त्यांनी ही आमची चूक नसल्याचे सांगितले.‘अॅप’वरील कुठलीही माहिती आम्ही विश्वसनीय मानत नाही. मुळात हे ‘अॅप’च खासगी असून याबाबत आम्हाला काहीही माहिती देण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले.