लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्यातील एका वनपरिक्षेत्रातून दुसऱ्या परिक्षेत्रात स्थानांतरण करताना (महामार्ग ओलांडताना) वन्यप्राण्यांच्या रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या चिंतेत टाकणारी आहे. मागील दोन वर्षात संपूर्ण राज्यात ३ वाघांचा आणि ५० बिबट्यांचा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे.२०१६ च्या आकडेवारीनुसार संपूर्ण राज्यात १४ वाघांचा मृत्यू झाला. यात ११ नैसर्गिक, एकाचा शिकारीने तर दोन वाघांचा मृत्यू रस्ता अपघातात झाला. तर ७ बिबट्यांची शिकार करण्यात आली असून, २९ बिबट्यांचा मृत्यू रस्ता अपघातात झाले. याचप्रकारे २०१७ मध्ये ९ बिबट्यांची शिकार करण्यात आली तर २१ बिबट्यांचा मृत्यू रस्ता अपघातात झाले.गेल्या वर्षी एक वाघ (बाजीराव) याचा नागपूर-अमरावती महामार्ग ओलांडताना वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. वाघ, बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांचेही अपघातात मृत्यू होत आहेत. या महामार्गाला ओलांडून बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी पुढे कोंढाळी, काटोल, कळमेश्वरमार्गे पेंच व्याघ्र प्रकल्पापर्यंत येतात. वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी त्यांचे स्थलांतरणही आवश्यक मानले जाते. एकाच परिक्षेत्रात राहिल्याने त्यांचे अस्तित्व संकटात येण्याची भीती असते.
साडेतीन महिन्यात वाघ-बिबट्याचा अपघातात मृत्यूनागपूर-अमरावती महामार्गावर १३ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी कोंढाळी रेंजच्या जुन्या पाण्याच्या शिवाराजवळ एका वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी २९ डिसेंबर २०१७ रोजी अमरावती महामार्गावर बोरमधील प्रसिद्ध वाघ बाजीरावला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन मारले होते.
धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना व्हावीमानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी सांगितले की, वाघ-बिबट किंवा इतर वन्यप्राण्यांचे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते थांबायला नको. अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मार्गासाठी वन विभागाची परवानगी घेतली जाते. वन्यप्राण्यांच्या ये-जा यासाठी अंडरपासेस बांधणे आवश्यक आहे. परंतु जे रस्ते अगोदरच बांधले गेले किंवा अभयारण्याला लागून नाहीत अशा रस्त्यांवरील धोकादायक ठिकाणांची ओळख व्हावी आणि तिथे आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.