लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बॅनरखाली देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे १० लाख कर्मचारी आणि अधिकारी बुधवारी संपावर गेले. त्यामुळे नागपुरातील विविध बँकांच्या शाखांमध्ये कामकाज ठप्प होते. संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.संपादरम्यान किंग्जवे येथील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर सकाळी १०.३० वाजता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी निदर्शने केली. या प्रसंगी जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकार आणि बँक व्यवस्थापनाविरोधात नारेबाजी आणि प्रदर्शन केले. बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेचे विलिनीकरण थांबवावे आणि थकित आणि बुडालेली कर्जे वसुली करावीत, अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या.यावेळी झालेल्या सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले. ईस्टर्न बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोभाटे, महासचिव जयवंत गुर्वे, एनओबीडब्ल्यूचे नितीन बोरवणकर, इंटकचे नागेश दंडे, एआयबीओसीचे प्रदीप चक्रवती यांनी संपाचा उद्देश आणि सरकारच्या सामान्यविरोधी धोरणाची माहिती दिली. बँकांचे विलिनीकरण करून बँका मोठ्या करण्याचा सरकारचा मानस आहे. पण कर्ज मोठ्या प्रमाणात देऊन जास्त जोखीम घेण्याचा हा प्रकार आहे. कॉर्पोरेट क्षेत्राच्या थकित कर्जामुळे बँका आधीच संकटात आहेत. विलिनीकरणामुळे बँका सक्षम होणार नाहीत. सहा बँकांच्या विलिनीकरणाने स्टेट बँक मोठी बँक झाली नाही, पण या बँकेसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. सरकारच्या निर्णयामुळे बँकांच्या शाखा वाढविण्याची गरज असताना अनेक शाखा बंद होतील. विलिनीकरणामुळे कर्मचारी अतिरिक्त होऊन त्यांच्या रोजगारावर संकट येणार आहे. संचालन सत्यशील रेवतकर यांनी केले.या प्रसंगी श्रीकृष्ण चेंडके, रमेश हेडाऊ, नरेंद्र भुजाडे, ललित उपासे, शंकर बावनगडे, दिलीप पोतले, स्वयंप्रकाश तिवारी, निशांत हुमणे, विजय जोध, प्रभात कोकाश, सुजाता रोकडे, आर.पी. राव, अंजली राणा, गीता दत्ता, वैशाली महाबुद्धे, सुजाता गेडाम, विनायक मस्के, संदीप पाली, अनिल वासनिक, रवी जोशी, अरविंद बन्सोड, विभित चामगाये, सुनील बेलखोडे, युगल सेलोकर, शिरीष जोशी, दिनेश मेश्राम, प्रतिमा मसराम, अरविंद गड्डीकर, मोहम्मद इम्तियाज, पूजा रंगारी, तृप्ती दुरुगकर, मनीषकुमार आणि कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपुरात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:27 PM
केंद्र सरकारच्या बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बॅनरखाली देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे १० लाख कर्मचारी आणि अधिकारी बुधवारी संपावर गेले. त्यामुळे नागपुरातील विविध बँकांच्या शाखांमध्ये कामकाज ठप्प होते. संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.
ठळक मुद्देबँकांच्या विलिनीकरणाला विरोध : सरकारविरुद्ध प्रदर्शन