नागपूर : मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या अनुराग ऊर्फ विनोद राजकुमार खन्ना (वय ३४) नामक कैद्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. त्याचा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप लावून कुटुंबीयांनी याप्रकरणी कारागृह प्रशासनाला दोषी धरले आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने घातपाताचा इन्कार केला आहे. बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथील कन्नमवार वॉर्डातील रहिवासी असलेल्या अनुरागवर अपहरण, लुटमारीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे तो मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त (कैदी क्रमांक ६४०/१६) होता. त्याला सोमवारी रात्रीपासून मळमळ, जळजळ होऊ लागली. अॅसिडिटीचा त्रास असावा म्हणून मध्यवर्ती कारागृहातील इस्पितळाच्या कर्मचाऱ्यांनी अनुरागवर प्राथमिक उपचार केले. रात्री ११.३० च्या सुमारास त्याची प्रकृती ढासळल्यामुळे डॉ. तिवारी यांच्या सल्ल्यावरून त्याला कारागृह रक्षक राजेश महादेव डोईफोडे (वय ३३) यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला ११.५५ ला मृत घोषित केले. दरम्यान, अनुरागच्या मृत्यूची सूचना कुटुंबीयांना मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास देण्यात आली. त्यामुळे कुटुंबीय धावत-पळत नागपुरात पोहोचले. त्यांनी अनुरागची हत्या करण्यात आल्याचा आक्रोश करीत कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप लावले. खन्ना कुुटुंबीय आणि त्यांचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येत मेडिकलमध्ये पोहोचले. त्यांनी अनुरागची हत्या झाल्याचे सांगून जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत तेथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अर्चना भोयर आणि अन्य काही सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवून विविध गंभीर आरोप केल्यामुळे मेडिकल परिसरात तणाव निर्माण झाला. तो लक्षात घेता धंतोली पोलिसांनी तहसीलदारांना (तालुका दंडाधिकारी) पत्र देऊन इन्क्वेस्टला उपस्थित राहण्याची विनंती केली. कैद्याचा आतमध्ये घात ?४काही कुख्यात गुंड आतमधील नव्या आणि कच्च्या कैद्यांना (न्यायाधीन बंदी) छळतात. त्यांच्याकडून मालिश करून घेण्यासारखी व्यक्तिगत कामे करवून घेतात. नकार दिल्यास शत्रूसारखी वागणूक देतात, जबर मारहाणही करतात. दोन वर्षांपूर्वी एका कच्च्या कैद्याला अशाच प्रकारे बरॅकीतच काही कैद्यांनी गळा आवळून ठार मारले होते. त्यामुळे अनुरागसोबतही असाच काही घात झाला काय, अशी शंका उपस्थित झाली आहे. कारागृह प्रशासन त्या अँगलनेही चौकशी करीत आहे.
कैद्याच्या संशयास्पद मृत्यूने वाद
By admin | Published: January 20, 2016 3:54 AM