लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: पावसाळा किंवा उन्हाळ्यातही वादळ आले की, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडण्याचे किंवा त्यांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र नीट अभ्यास केला की, काही विशिष्ट प्रजातीचीच झाडे उन्मळून पडण्याचा प्रकार तुमच्या लक्षात येऊ शकताे. वनस्पतीतज्ज्ञ प्राची माहुरकर यांनी यावर प्रकाश टाकला. पावसाळ्याच्या लहान-माेठ्या वादळ किंवा वाऱ्यामुळे जी झाडे अधिक काेसळणाऱ्यांमध्ये रेन ट्री (चिचव्यासारखे बारीक पानांचे), काशिद, साेनमाेहर, गुलमाेहर अशा विदेशी झाडांचा समावेश अधिक असताे. याशिवाय शिरीष, जांभूळ व पांगारासारखी देसी प्रजातीची झाडेही उन्मळून पडतात. प्राची माहुरकर यांनी यामागे तीन प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट केले.
- रस्त्याच्या कडेला मुख्यत्वे भरभर वाढणारी विदेशी झाडे लावण्यात येतात. माेठे वाढणारे रेन ट्री, गुलमाेहर, साेनमाेहर आदींचा समावेश अधिक असताे. वेगाने वाढत असल्याने मुळे कमजाेर असतात व त्यांच्या फांद्याही तुलनेने कमकुवतच असतात. ही झाडे लवकर वाढतात आणि लवकर तुटतातही. या तुलनेत देसी झाडे माेठ्या वादळातही मजबुतीने उभी राहतात.
- दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे नेहमीच्या विकासकामांमुळे त्यांची मुळे तुटत राहतात. कधी रस्ते दुरुस्ती, कधी नाल्या तर कधी केबल टाकण्यासारख्या कामात त्यांची मुळे कापली जातात. त्यामुळे या झाडांचा आधार कमजाेर हाेताे व छाेट्याशा वादळ, वाऱ्यानेही ती उन्मळून पडतात किंवा फांद्या तुटतात.
- तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ही झाडे एकेकटी उभी असतात. त्यांना इतर झाडांचा आधार मिळत नाही. जंगलातील झाडे एकमेकांच्या मुळांच्या आधाराने मजबुतीने उभी राहतात. तसा आधार यांना मिळत नाही.