नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या धोरणांतर्गत नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे पंजीबद्ध (रजिस्ट्री) करून देण्याची प्रक्रीया मागील सहा वर्षापासून सुरू आहे. आजवर साडेसात हजार झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे. पट्टे वाटपाची प्रक्रीया सुरू होती. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे दोन महिने पट्टे वाटपाला ब्रेक लागले आहे. . महापालिका,नासुप्र व नझुलच्या जागेवर वसलेल्या शहरातील अधिकृत झोपडपट्ट्यातील ७ हजार ५०० झोपडपट्टीधारकांना मालकीपट्ट्याची रजिस्ट्री करून मिळाली. मात्र लोकसभानिवडणुकीचीआचारसंहिता लागू झाल्यापासून पट्टे वाटपाचे काम ठप्प झाले आहे. शहरातील जवळपास एक लाख झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र ही प्रक्रीया संथ असल्याने पट्टे वाटपाला अपेक्षीत गती मिळालेली नाही. आता मतमोजणीनंतर या प्रक्रियेला गती मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्य शासनाने झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ शहरातील एक लाखाहून अधिक अधिक लोकांना मिळणार आहे. शहरातील नासुप्रच्या मालकीच्या जागेवरील वस्त्यातील ४ हजार झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्यात आले आहे. महापालिकेच्या जागेवरील ज्वळपास दिड हजार लोकांना मालकी पट्टे देण्यात आले. पूर्व नागपुरातील कुंभार टोली, पडोळेनगर,आदर्शनगर,डिप्टीसिग्नल, हिवरीनगर, नेहरूनगर, पँथरनगर, प्रजापतीनगर, साखरकरवाडी, संघर्षनगर, सोनबानगर, उत्तर नागपुरातील इंदिरा नगर व कस्तुरबा नगर आदी भागातील काही झोपडपट्टीधारकांना रजिस्ट्री मिळालेल्या आहे. नासुप्रच्या दक्षिण नागपूर विभागातील हसनबाग, जाटतरोडी, न्यू नेहरूनगर, स्वातंत्र्यनगर नंदनवन या वस्त्यात पट्टे वाटप करण्यात आले. पश्चिम विभागातील पांढराबोडी भागातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे पूर्वतील मेहतरपुरा, दक्षिण पश्चिममधील सुदर्शननगर, फकिरावाडी, रामबाग व बोरकरनगर, बन्सोड मोहल्ला या वस्त्यातील झोपडपट्टीधारकांना रजिस्ट्री देण्यातआली आहे. मात्र अजूनही हजारो लोकांना पट्टे वाटप झालेले नाही. त्यात निवडणूक आचारसंहितेमुळे पट्टे वाटपाला ब्रेक लागले आहे.
आचारसंहितेमुळे दोन महिने पट्टेवाटप ठप्प, मतमोजणीनंतर वाटपाला मिळणार गती
By गणेश हुड | Published: March 30, 2024 3:12 PM