नागपूर : फजल अली आयोगाने स्वतंत्र विदर्भ दिला होता. परंतु, आपल्या करंटेपणाने आणि राजकारण्यांना आलेल्या माजामुळे तोंडचा घास पळवला गेल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवानिवृत्त) विकास सिरपूरकर यांनी आज येथे केले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी लिहिलेल्या ‘आमचा ७/१२ आमच्या नावे’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना न्या. सिरपूरकर आपल्या भावना व्यक्त करत होते. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड. वामनराव चटप होते तर व्यासपीठावर माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती, ॲड. सुरेश वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, डॉ. जी. एस. ख्वाजा, विष्णुपंत आष्टीकर, प्रभाकर कोंडबत्तूनवार, अरुण केदार, रंजना मामर्डे उपस्थित होते.
राजकारण्यांचे समाजकारण हे माजकारण असते, हे संयुक्त महाराष्ट्र कृती समितीद्वारे तत्कालीन राजकीय नेत्यांनी सिद्ध केले. विदर्भ वेगळा झाला असता तर त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नसते. या भीतीपोटी त्यांनी विदर्भाला महाराष्ट्रात टाकले. मी प्रखर विदर्भवादी असून, मी असो वा नसो, विदर्भ स्वतंत्र होणारच असल्याचे न्या. विकास सिरपूरकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन मुकेश मासूरकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रभाकर कोंडबत्तूनवार यांनी केले.
विदर्भाचे आंदोलन हे बहुजनांचे - श्रीनिवास खांदेवाले
विदर्भवाद्यांचे आंदोलन हे अभिजनांचे असल्याचा भ्रम मुद्दामहून निर्माण केला जात आहे. मात्र, हे आंदोलन बहुजनांचे अर्थात सर्वांचेच असल्याचे डॉ. श्रीनिवास खांदेवाले यावेळी म्हणाले. या आंदोलनातून साहित्यिकांनी फारकत घेतल्याचे कायम दिसते. त्यांनी तिकडले हारतुरे चालतात. परंतु, जेव्हा अन्याय होतो, तेव्हा विदर्भ आंदोलक आठवत असतात, असा टोला खांदेवाले यांनी विदर्भातील सांस्कृतिक व साहित्य क्षेत्राला लगावला.
पुन्हा एकदा एल्गार - वामनराव चटप
लोकमान्य टिकळांचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’, अण्णाभाऊ साठे यांचे ‘जागते रहो’, सावरकरांचे ‘रणाविन स्वातंत्र्य कुणा मिळाले’ या घोषणांचा आणि कृतींचा कृतिशील पुनरुच्चार होणे गरजेचे असल्याचे मत ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त करतानाच पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याची ही वेळ असल्याचे म्हटले.
..................