सुमेध वाघमारे
नागपूर : मेडिकलमधील रुग्णाला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी स्ट्रेचरचे धक्के खात वर्दळीचा रस्ता ओलांडावा लागतो. यात अपघाताची शक्यता असते, सोबतच उपचार मिळण्यास उशीरही होतो. याची दखल घेत मेडिकल प्रशासन मेडिकल ते ट्रॉमा केअर सेंटर जोडण्यासाठी ‘स्कायवॉक’ निर्माण करणार आहे. याशिवाय, मुलींसाठी ४५० खोल्यांचे वसतिगृह, नवे पेईंग वॉर्ड, स्किल लॅबसह इतरही विकासात्मक कामे प्रस्तावित आहेत. यामुळे नव्या वर्षात मेडिकलचा चेहरामोहरा बदलणार आहे.
मेयो, मेडिकलच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दोन्ही रुग्णालयांना भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. इटनकर यांनी आवश्यक पायाभूत सोयी व बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना दोन्ही रुग्णालयांना दिल्या होत्या. त्यानुसार मेडिकलने विविध कामांचा प्रस्ताव नुकताच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर केला. या कामांसाठी लागणाऱ्या जवळपास ३०० कोटींमधून राज्य सरकार ७५ टक्के तर जिल्हा नियोजन समिती २५ टक्के निधी देणार आहे.
- मुलींसाठी विशेष वसतिगृह
‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. त्यामुळे मेडिकल प्रशासनाने ४५० खोल्यांच्या नवीन वसतिगृहाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी ६२.८४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
- ५० बेडचा पेईंग वॉर्ड
मेडिकलने ५० बेडच्या पेईंग वॉर्डचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी जवळपास ४५ कोटी खर्च अपेक्षित आहे. या वॉर्डमुळे पैसे देऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- ओपीडीपासून ते मध्यवर्ती प्रयोगशाळेचे अपग्रेडेशन
मेडिकलच्या ओपीडीपासून ते मध्यवर्ती प्रयोगशाळा, कॅफे हाऊस, ट्रॉमा केअर सेंटरचे ‘अपग्रेडेशन’ करण्यासाठी १५० कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. याशिवाय मुख्य प्रवेशद्वारावर २ कोटी, रस्त्यांवर १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
- विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ‘स्किल लॅब’
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्य व अनुभवांचाही विकास व्हावा, याकरिता कौशल्यावर (स्किल) आधारित प्रयोगशाळा मेडिकलमध्ये सुरू करण्यासाठी २० कोटी रुपये खर्चून ‘स्किल लॅब’ उभारली जाणार आहे.
-३०० कोटींचा प्रस्ताव सादर
वैद्यकीय शिक्षण विभागाला ३०० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळताच जिल्हाधिकारी स्तरावर त्निविदा निघून कामाला सुरूवात होईल. यामुळे नव्या वर्षात मेडिकलचे स्वरुप बदलणार आहे.
-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल
:: प्रस्तावित कामे
-४५० खोल्यांचे मुलींसाठी वसतिगृह
- ५० बेडचे नवे पेर्इंग वॉर्ड
- संपूर्ण मेडिकलला सुरक्षा भिंत
- ‘स्कॉय वॉक’
- मोड्युलर शस्त्रक्रिया गृह
- लॉण्ड्री व किचनचे नुतनीकरण
- स्किल लॅब
- ओपीडी, मध्यवर्ती प्रयोगशाळा, कॅ फे हाऊस, ट्रॉमा केअर सेटरचे होणार अपग्रेडेशन
- कॉलेज सभागृहाचे नुतनीकरण
- नवे गेस्ट हाऊस
- आकर्षक प्रवेशद्वार
- क्रीडा कॉम्प्लेक्स
- तीन नवे ‘एसटीपी प्लान’
- विद्युत व्यवस्थेचे नुतनीकरण