नागपूर : वर्तमान राजकारणामुळे देशात असुरक्षेचे वातावरण पसरले आहे, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी शुक्रवारी नागभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी देशाचे माजी सॉलिसिटर जनरल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीश साळवे उपस्थित होते.
देशातील सध्याची परिस्थती पाहता राज्यघटना धोक्यात असल्याची अनेकांची भावना झाली आहे. परंतु, हा समज चुकीचा आहे. देशाची न्यायव्यवस्था राज्यघटनेची रक्षक आहे. न्यायालये राज्यघटनेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र कार्य करीत आहेत. देशामध्ये धाडसी न्यायमूर्ती व वकील मंडळी आहेत. परिणामी, देशाची राज्यघटना सुरक्षित आहे, असे न्या. बोबडे यांनी पुढे बोलताना सांगितले.
नागपुरातील नागभूषण अवॉर्ड फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी निवृत्त न्या. शरद बोबडे यांच्यासह स्वातंत्र संग्राम सैनिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीश साळवे यांना अनुक्रमे २०२१, २०२० व २०१९ मधील नागभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
निवृत्त न्यायमूर्ती सिरपूरकर यांनीही देशाच्या राज्यघटनेला धोका नसल्याचे नमूद केले. सर्वोच्च न्यायालय कधीच देशाच्या राज्यघटनेत बदल करू देणार नाही. वर्तमान राज्यघटना कायम आहे व कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तिन्ही पुरस्कारर्थी आपापल्या बाबतीत श्रेष्ठ आहेत आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जगात नागपूरचे नाव मोठे केले आहे, असेदेखील न्या. सिरपूरकर यांनी सांगितले.
देशाची राज्यघटना धोक्यात असल्याचा मुद्दा लीलाताई चितळे यांनी उपस्थित केला होता. त्यावर नंतर न्या. बोबडे व न्या. सिरपूरकर यांनी त्यांचे मत व्यक्त केले. समानता, न्याय व स्वातंत्र भारतीय राज्यघटनेचा पाया आहे. परंतु, सध्या या तिन्ही तत्त्वांना धोका निर्माण झाला आहे. करिता नागरिकांनी एकजूट होऊन राज्यघटनेचे संरक्षण करावे, असे आवाहन लीलाताई यांनी यावेळी केले.
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे, सचिव ॲड. अमोल जलतारे, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कमल सतुजा, सचिव ॲड. नितीन देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनीही पुरस्कारर्थींचा सत्कार केला. फाउंडेशनचे अध्यक्ष व राज्यसभेचे माजी सदस्य अजय संचेती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हा कार्यक्रम वर्धा रोडवरील हॉटेलमध्ये पार पडला. फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष विलास काळे, उपाध्यक्ष झमीन अमीन, सचिव ॲड. निशांत गांधी व कोषाध्यक्ष सतीश गोयल व्यासपीठावर उपस्थित होते.
नागपूरसोबत भावनिक नाते - ॲड. साळवे
बालपण घालवल्यामुळे नागपूरसोबत भावनिक नाते आहे. नागपूरच्या रोडवर सायकलने फिरत होतो. त्यामुळे विविध परिसर ओळखीचे आहेत. जीवनातील अनेक संस्मरणीय क्षण नागपूरशी संबंधित आहेत. नागपूर घरासारखे आहे आणि हा पुरस्कार घरचा असल्यामुळे त्याला अधिक महत्त्व आहे, अशा भावना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीश साळवे यांनी व्यक्त केल्या. लहानपणी आईमुळे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्याचा वकिली व्यवसायात फायदा होतोय, असेही त्यांनी सांगितले.
नागपूरला जगात ओळख मिळवून दिली - देवेंद्र फडणवीस
हे पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान केले जाणार होते. परंतु, तातडीने गुजरातला जावे लागल्यामुळे ते कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. करिता, त्यांनी व्हिडीओ संदेश पाठवून तिन्ही पुरस्कारर्थींचे अभिनंदन केले. तिन्ही पुरस्कारर्थींनी नागपूरला संपूर्ण जगामध्ये ओळख मिळवून दिली. तिघेही श्रेष्ठ व नम्र स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्यामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.