नागपूर : भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यमान लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी पूर्ण होत असून १ मे रोजी मनोज पांडे त्यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. विशेष म्हणजे मनोज पांडे यांच्या रुपाने भारतीय लष्कराची धुरा परत एकदा मूळच्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्याच्या हाती येत आहे.
मूळचे नागपूर येथील असलेले मनोज पांडे यांना भारतीय लष्कराचा प्रदीर्घ अनुभव आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची डिसेंबर १९८२ मध्ये अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. त्यांनी ३९ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत इंजिनिअर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माऊंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती. मनोज पांडे हे देशातील पहिले इंजिनियर असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखांची कमान सोपवली जाईल.
‘एनडीए’ ते लष्करप्रमुख
लेफ्टनंट जनरल पांडे यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर स्थित वायुसेना नगरातील केंद्रीय विद्यालयात झाले. अकरावी नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी डेहराडूनमधील मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२ मध्ये ते पुण्याच्या कोर ऑफ इंजिनिअर्स (बॉम्बे सॅपर्स) या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. कॅम्बर्ली (ब्रिटन) स्टाफ कॉलेज, महूचे आर्मी वॉर कॉलेज, दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी ‘ हायर कमांड कोर्स ’ केला आहे. आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये देखील सक्रियरीत्या सहभागी झाले होते.
अनोखा योगायोग
मनोज पांडे यांच्या मातोश्री प्रेमा पांडे या नागपूर आकाशवाणीच्या उद्घोषिका होत्या. विद्यमान लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या मातोश्री सुधा यादेखील ऑल इंडिया रेडिओत उद्घोषिका होत्या. लष्करी इतिहासातील हा एक अनोखा योगायोगच मानावा लागेल.