नागपूर : सन २०२२-२३ च्या खरीप हंगामात राज्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले असले तरी सततचे ढगाळ वातावरण, मुसळधार व अति मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकावर झालेल्या रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेसोबतच उत्पादनात घट झाली आहे. उत्पादन खर्च वाढला असताना दर मात्र जेमतेम मिळत असल्याने राज्य सरकार यावर कायमस्वरुपी ताेडगा काढणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोयाबीनपासून केवळ १७ ते १८ टक्के तेल मिळत असले तरी आपल्या देशात या पिकाकडे तेलबिया म्हणून बघितले जाते. देशात सोयाबीन उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. मागील पाच वर्षांपासून साेयाबीनचे पीक विविध किडी आणि रोगांना बळी पडत असल्याने माेठे नुकसान सहन करावे लागते.
चालू खरीप हंगामात जुलै ते ऑक्टोबर या काळात राज्यात सर्वदूर सातत्याने मुसळधार व अति मुसळधार पाऊस कोसळला. पाऊस व सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली. प्रतिकूल हवामानामुळे पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव झाला. पुरामुळे पिके खरडून गेली. रोग व किडींच्या तावडीतून पीक वाचवायचे झाल्यास महागडी कीटक व बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढतो. तुलनेत दर मात्र सरासरी पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक मिळत नाही. त्यामुळे सोयाबीनचे पीक आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होत चालले आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
उत्पादकतेसोबत उत्पादनात घट
मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात राज्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ३ लाख ४ हजार ७२० हेक्टरने वाढले आहे. सात-आठ वर्षांपूर्वी सरासरी एकरी किमान ९ ते १३ क्विंटल साेयाबीनचे उत्पादन व्हायचे. तीन-चार वर्षांपासून सरासरी एकरी ३ ते ५ क्विंटल साेयाबीनचे उत्पादन हाेत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
या किडींचे संकट कायम
मागील तीन वर्षांपासून सोयाबीनवर येल्लो मोझॅक या बुरशीजन्य रोगासह, खोडमाशी, चक्रीभुंगा, पाने खाणारी हिरवी उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, केसाळ अळी, शेंगा पोखरणारी अळी, पांढरी माशी यासह इतर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने साेयाबीनची उत्पादकता व उत्पादन घटत असून, उत्पादन खर्च वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पावसामुळे नुकसान
जुलै ते ऑक्टोबर २०२२ या काळात कोसळलेल्या मुसळधार व अति मुसळधार पावसामुळे राज्यातील ३५ लाख २१ हजार ८६९ हेक्टरमधील विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची एकूण संख्या ३८ लाख ४४ हजार ८२६ एवढी आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ४,५३,५८८.८० काेटी रुपयांची आवश्यकता आहे. यात साेयाबीन उत्पादक व पिकाचा समावेश आहे.
सोयाबीनचे पेरणी क्षेत्र (हेक्टर)
विभाग - सन २०२१-२२ - २०२२-२३१) कोकण - ००,००० - ००,०००
२) नाशिक - १,६६,१७४ - १,९४,८८४३) पुणे - २,२३,४१० - २,९०,७४४
४) कोल्हापूर - १,६७,५७६ - १,७३,४०६५)औरंगाबाद - ५,०८,८३५.७ - ५,७६,१६१
६) लातूर - १७,७९,८३१ - १९,११,३२७७) अमरावती - १४,६९,४६५ - १४,७६,५९०
८) नागपूर - २,८९,८४१ - २,८६,७४१९) एकूण - ४६,०५,१३३ - ४९,०९,८५३
जगात कमी-अधिक पाऊस रोधक तसेच काही कीड व रोग प्रतिबंधक सोयाबीनचे वाण विकसित करण्यात आले आहेत. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विकसित केलेले सोयाबीनचे वाण भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे.
- मधुसूदन हरणे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट, जिल्हा वर्धा