नागपूर : लाेकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक निर्धारित परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करून त्या पुढे ढकलण्यात आल्या. युपीएससी, सीए आदी परीक्षा पुढे करण्यात आल्या. त्याप्रमाणे सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट) पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी प्रविष्ट उमेदवारांकडून हाेत आहे.
पुणे विद्यापीठातर्फे येत्या ७ एप्रिल राेजी सेटची परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास ३ लाख उमेदवार प्रविष्ट आहेत. यातील बहुतेक उमेदवार अनुदानित, विना अनुदानित शाळा-महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर कार्य करीत आहेत. या बहुतेक शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक सध्या निवडणुकीच्या कामावर लागले आहेत. निवडणूक काम हे संवेदनशील असते व त्यात झालेली कुठलीही चूक अडचणीत टाकणारी असते. यातील बहुतेक शिक्षक सेटसाठी प्रविष्ट असल्याने त्यांच्यासाठी परीक्षेची तयारी करणे अडचणीचे तर आहेच, पण निवडणुकीचे काम साेडून परीक्षेसाठी जाणेही अडचणीचे हाेणार असल्याने या शिक्षकांची चिंता वाढली आहे. परीक्षेस मुकले तर यावर्षी संधी हुकेल, ही भीती त्यांना आहे.
युपीएससी पूर्व परीक्षा व आयाेगाअंतर्गत असलेली अभियांत्रिकी सेवा परीक्षा २६ मे २०२४ राेजी निर्धारित हाेती. मात्र लाेकसभा निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलत १६ जूनला निर्धारित करण्यात आली आहे. दुसरीकडे चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ची परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षांप्रमाणे सेटची परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अनेक उमेदवारांनी लाेकमतशी बाेलताना केली. यामुळे निवडणुकीचे कामही साेडावे लागणार नाही आणि तयारी करायलाही वेळ मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.