मुकेश कुकडे
नागपूर : उन्हाळ्यात नागपूरसह विदर्भाचे तापमान ४८ डिग्रीपर्यंत पोहोचते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत बऱ्याच रस्त्यांवर लॉकडाऊनचा अनुभव येतो. कुलर, एसीही या उकाड्यापुढे फेल ठरते. कृत्रिम गारवा देणारे उपकरणे उन्हाळ्यात फेल पडत असल्याने नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात देशी गारवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून, मंदिराचे तापमान ५ ते ७ डिग्रीने घसरले आहे.
टेकडी गणेश मंदिरात भरउन्हातही भाविक आता दर्शनासाठी येत आहे. येथील गारव्याचा अनुभव घेतल्यानंतर भाविकांचे मन प्रसन्न होत असून, काही काळ मंदिरात निवांतपणाचा अनुभव घेत आहेत. मंदिराच्या व्यवस्थापनाने परिसराला हिरवी मॅट टाकली आहे. या मॅटच्या खाली आणि वर अवघ्या २ फुटांच्या अंतरावर स्प्रिंकलर लावले आहेत. या स्प्रिंकलरमधून पाण्याचे तुषार दिवसभर उडतात. ते भाविकांच्या अंगावर पडताच त्यांना गारव्याचा फिल करून देतात. हिरवी मॅट आणि सातत्याने पाण्याचे पडणारे तुषार यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात गारवा पसरला आहे. या स्प्रिंकलरमध्ये गुलाबजल आणि खसचे सेंट टाकण्यात येत असल्याने संपूर्ण परिसरात सुवास दरवळतो आहे. हा अनुभव येणाऱ्या भाविकांना सुखद भासतो आहे.
- सध्या ४२ डिग्री तापमान पोहोचले आहे. घराबाहेर पडल्यावर ऊन अंगाला झोंबते आहे; पण मंदिरात आल्यावर जणू झऱ्यापुढे बसलोय की काय, असा फिल येतो आहे. मंदिरात येऊन मन प्रसन्न होत असून, काही काळ निवांत बसण्याची इच्छा होत आहे.
सीमा गंधे, भाविक
- दरवर्षी आम्ही उन्हाळ्यात मंदिरात डक्ट लावून गाभाऱ्याचा परिसर थंड ठेवण्याचा प्रयत्न करतो. मंदिराच्या परिसरात हिरवी मॅट लावतो; पण त्याचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. आम्हाला स्प्रिंकलर लावण्याची एका भाविकाने कल्पना दिली. त्यामुळे यावर्षी आम्ही हा प्रयोग केला. खरंच यामुळे मंदिराचे तापमान ५ ते ७ डिग्रीने कमी झाले आहे. भाविकांचेही मन प्रसन्न होत आहे.
श्रीराम कुळकर्णी, सचिव, गणेश टेकडी मंदिर