लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध सावकारांकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे विशेष सुरक्षा शाखेतील (एसपीयू) पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आणि त्यातील एकाला गुरुवारी अटक केली.अतिमहत्त्वाच्या आणि महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीयूवर असते. प्रसंगी स्वत:च्या जीवावर खेळून एसपीयूचे जवान महत्त्वाच्या/अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या जीविताचे रक्षण करतात. अशी महत्त्वपूर्ण आणि धाडसी जबाबदारी पार पाडणाºया एसपीयूतील विनोद भगवानजी घेवंदे (वय २९) यांनी बुधवारी २ च्या सुमारास सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या कनपटीवर गोळी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे सुरक्षा दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. विनोदच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस बुधवारपासूनच कामी लागले. त्याचे मित्र, कुटुंबीय आणि निकटवर्तीय अशा सर्वांकडूनच माहिती घेण्यात आली. त्यातून विनोदने अवैध सावकारांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सूत्रांच्या माहितीनुसार, विनोदने सहा महिन्यांपूर्वी अत्यावश्यक गरज भागविण्यासाठी वानाडोंगरीतील अवैध सावकार आकाश झाडे याच्याकडून २० हजार रुपये कर्ज घेतले होते. आकाश आठवड्याला दोन हजार रुपये व्याज घेत होता. एका महिन्यातच २० हजारांचे ३० हजार झाले. ते चुकते करण्यासाठी विनोदने पुन्हा संगीता जाधव नामक महिलेकडूनही १३ हजार रुपये व्याजाने घेतले. रक्कम देण्यापूर्वी आरोपी अवैध सावकारांनी विनोदकडून त्याच्या मालमत्तेचे खरेदीखत अथवा असेच काहीतरी मुद्रांकावर लिहून घेतले होते. ते कागदपत्र सार्वजनिक करण्याची धमकी देऊन आरोपी विनोदकडून रक्कम उकळत होते. रक्कम वसूल करण्यासाठी ते त्याच्या घरी जाऊन धमकावतही होते आणि कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचाही धाक दाखवत होते. या प्रकाराची माहिती विनोदच्या कुटुंबीयांनी आणि जवळच्यांनी पोलिसांना गुरुवारी सांगितली. त्यातून अवैध सावकारांचा जाच असह्य झाल्यामुळेच विनोदने आत्महत्या केल्याचे उघड झाले.त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी आरोपी आकाश झाडे तसेच संगीता जाधवविरुद्ध गुन्हा दाखल केला. आकाशला अटक करण्यात आली असून, संगीताची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पुन्हा एक आरोपी असल्याचे सांगितले जाते.एमआयडीसीत सावकारांचा सुळसुळाटएमआयडीसीत अनेक कंपन्या आहेत. परिणामी त्या भागात राहणाऱ्या मध्यवर्गीय कुटुंबीयांची, कामगारांची संख्याही मोठी आहे. अडीअडचणीच्या वेळी ही मंडळी अवैध सावकारांकडून कर्ज घेऊन आपली गरज भागविते. आठवड्याला १० टक्क्यापासून तो महिन्याला ३० टक्क्यांपर्यंत आरोपी सावकार अडल्या-नडलेल्यांकडून रक्कम उकळतात. १० हजार रुपये कर्ज दिल्यास रोजचे व्याजाचे १०० रुपये वसूल करणारेही एमआयडीसीत आहेत. कर्ज देण्यापूर्वी अडलेल्या व्यक्तींकडून ही मंडळी त्याची मालमत्ता स्टॅम्पपेपरवर लिहून घेतात. ती नोटराईज केली जाते. त्याचाही खर्च कर्ज घेणाºयालाच करावा लागतो. १० हजारांचे कर्ज घेऊन रोजचे १०० रुपये व्याज देणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या भागात अवैध सावकारी करणाऱ्यांचाही सुळसुळाट झाला आहे.