दिलीप दहेलकर । गडचिरोली : गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत सहकारी संस्थांमार्फत करण्यात येत असलेल्या धान खरेदीची प्रक्रिया व्यापक स्वरूपाची आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळात उपप्रादेशिक व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांची मिळून एकूण १२० पैकी ७२ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे एका प्रतवारीकाराला (गे्रडर) चार ठिकाणच्या धान खरेदी केंद्राचा कारभार सांभाळावा लागतो. यामुळे महामंडळाचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळले आहे. याता थेट परिणाम धान खरेदीसह बोनस वाटपावर होत आहे.आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत गडचिरोली येथे प्रादेशिक कार्यालय आहे. याशिवाय कुरखेडा, घोट, धानोरा, आरमोरी व कोरची येथे उपप्रादेशिक कार्यालय आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सर्व कार्यालये मिळून उपप्रादेशिक व्यवस्थापकाची एकूण चार पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ एक पद भरण्यात आले आहे तर तीन पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. व्यवस्थापक (प्रशासकीय) यांचे एक पद रिक्त आहे. उपव्यवस्थापकाची एकूण चार पदे मंजूर असून दोन पदे भरण्यात आली आहे, तर दोन पदे रिक्त आहेत. लेखापालाची सात पदे मंजूर असून तीन पदे भरण्यात आली आहे. चार पदे रिक्त आहेत. सहायक व्यवस्थापकाचे एक पद भरण्यात, एक पद रिक्त आहे. वरिष्ठ सहायकाच्या तीन पदांपैकी एक पद भरण्यात आले असून दोन पदे रिक्त आहेत. वरिष्ठ सहायकाची एकूण ११ पदे मंजूर आहेत. यापैकी आठ पदे भरण्यात आली असून तीन पदे रिक्त आहेत. टंकलिपिकाची सहा पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन पदे भरण्यात आली तर चार पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. गोदामपालच्या पाच पदांपैकी तीन पदे भरण्यात आली असून दोन पदे रिक्त आहेत.ट्रॅक्टर चालकाची दोन पदे तर वाहनचालकाची पाच पदे रिक्त आहेत. क्लिनर एक व रखवालदाराची चार पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत एकूण १२० पदे मंजूर आहेत. यापैकी ४८ पदे भरण्यात आली आणि ७२ पदे रिक्त आहेत. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत पाचही उपप्रादेशिक कार्यालयात प्रतवारीकार (ग्रेडरची) एकूण ३० पदे मंजूर आहेत. त्यापैकी १५ पदे भरण्यात आली आहेत तर १५ पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामध्ये कुरखेडा कार्यालयाअंतर्गत दोन, घोट कार्यालयाअंतर्गत आठ, धानोरा दोन, आरमोरी दोन व कोरची उपप्रादेशिक कार्यालयात प्रतवारीकाराचे एक पद रिक्त आहे. पुरेसे प्रतवारीकार नसल्याने एका प्रतवारीकाराकडे चार धान खरेदी केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच मुख्यालय असलेल्या उपप्रादेशिक कार्यालयातही ग्रेडर लोकांना काम करावे लागत आहे. त्यांना चार केंद्रांवर चकरा मारून उपप्रादेशिक कार्यालय गाठावे लागते. आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत गडचिरोली प्रादेशिक कार्यालय तसेच पाच उपप्रादेशिक कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. तसेच अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गतही विविध पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी सातत्याने शेतकरी बांधवांकडून होत आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी विकास महामंडळातील रिक्त पदे भरण्याकडे राज्य शासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
रिक्त पदांमुळे आदिवासी महामंडळ खिळखिळे
By admin | Published: June 07, 2017 4:53 PM