लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटाची बांधणी करून त्यांना सक्षम करण्यात येते. गावागावात महिला बचत गटांची बांधणी करण्यासाठी शासनाने वर्धिनीची नियुक्ती केली आहे. या वर्धिनींना नागपूर जिल्ह्यात महिला बचत गटांची बांधणी करण्यासाठी ४५ दिवसांचे काम मिळाले होते. त्यासाठी वर्धा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील १५५ वर्धिनी कामालाही लागल्या होत्या. पण जिल्ह्यात जि.प. व पं.स.च्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने वर्धिनींचे काम थांबविण्यात आले आहे.शनिवारी या वर्धिनी आपल्या हातचे काम सोडून झालेल्या कामाचा अहवाल संबंधित अधिकाऱ्याला सोपवून आपल्या गावाकडे परतल्या. जिल्ह्यात ४५ दिवस वर्धिनीच्या ३१ चमू ९३ गावांमध्ये संपर्क साधून गरीब, वंचित, विधवा, परित्यक्त्या महिलांचा शोध घेऊन स्वयंसहाय्यता समूहाची बांधणी करणार होत्या. त्यासाठी १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यात वर्धिनी फेरीला सुरुवात झाली होती. वर्धेतून ५०, गडचिरोलीतून ४४ आणि नागपूर जिल्ह्यातून ६१ अशा एकूण १५५ वर्धिनींचा यात समावेश होता. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपासून लागली. वर्धिनींनी ग्रामीण भागात सुरू केलेल्या कामामुळे आचारसंहितेवर परिणाम होऊ नये म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी तात्पुरते हे काम थांबविले आहे.
जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे वर्धिनी परतल्या गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 9:05 PM
गावागावात महिला बचत गटांची बांधणी करण्यासाठी शासनाने वर्धिनीची नियुक्ती केली आहे. या वर्धिनींना नागपूर जिल्ह्यात महिला बचत गटांची बांधणी करण्यासाठी ४५ दिवसांचे काम मिळाले होते.
ठळक मुद्देजिल्ह्यात बांधणार होत्या बचत गटांचे जाळे : ४५ दिवसांचा होता कार्यक्रम