आॅनलाईन लोकमतनागपूर : उघड्यावर कचरा टाकून परिसरात घाण करणाऱ्यांची कमी नाही. वारंवार सूचना दिल्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला जातो. परंतु आता घाण करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. यात ८७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाला घाण करणाऱ्यांना दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहे.उपद्रव शोध पथकातील कर्मचाऱ्यांची स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पथकातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे. संयम कायम ठेवून काम करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी केले. महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवनात आयोजित उपद्रव शोध प्रतिबंधक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.स्वच्छतादूत नेमण्याचा ठराव सभागृहात पारित झाला होता. या पदाकरिता माजी सैनिकांचीच भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्या पद्घतीने आपण सैन्यात काम करीत होता त्याच पद्धतीने नागरिकांना शिस्त लावण्याचे करावयाचे आहे. काम करताना प्रशासनासोबत समन्वय ठेवा, असे आवाहन महापौरांनी केले. पथकातील जवानंना महापालिकेतर्फे गणवेश दिला जाईल, त्या गणवेशाचा दरारा व लौकिक कायम ठेवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.सेनेतील सैनिकांचे काम हे चोख व शिस्तबद्ध असते, हे समाजातील प्रत्येक नागरिकाला माहीत आहे. नागरिकांना शिस्त लागावी, यासाठीच ही नियुक्ती आहे. नागरिकांवर कारवाई करण्यापूर्वी यासंदर्भातील जनजागृती करावी, पत्रके वाटून पूर्वसूचना देण्यात यावी, असा सल्ला संदीप जोशी यांनी दिला.शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी२०१६ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरची घसरण झाली, त्यानंतर यासंदर्भातील विषयावर मंथन झाले. विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेअंती उपद्रव शोध पथक गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराच्या नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी शिस्त नाही, याला आळा घालण्यासाठी उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. पथकावर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असल्याची माहिती अश्विन मुदगल यांनी दिली. संचालन व आभारप्रदर्शन आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले.