आनंद शर्मा
नागपूर : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या एसी कोचच्या प्रवाशांना आता प्रवासात चादर, उशी, ब्लँकेटच्या सुविधेपासून वंचित रहावे लागणार नाही. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे फेब्रुवारीच्या अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रवाशांना १५० रुपये मोजावे लागणार आहेत.
कोरोनामुळे मार्च, २०२० मध्ये रेल्वेगाड्यांत प्रवाशांना बेडरोल देणे बंद करण्यात आले होते. यामुळे प्रवाशांना त्रास होत होता. त्यांना आपल्या घरून वजनदार ब्लँकेट, चादर घेऊन रेल्वेने प्रवास करावा लागत होता, परंतु आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एसी कोचच्या प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल देण्याची सुविधा सुरू केली आहे. नागपूर विभागातर्फे पुढील काही दिवसांत नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये कंत्राटदारामार्फत ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.
किटमध्ये काय राहील
-पांढऱ्या रंगाची चादर
-तपकिरी/निळ्या रंगाचे ब्लँकेट
-इनफ्लेटेबल एअर पिलो
-पांढऱ्या रंगाचे पिलो कव्हर
-फेस टॉवेल/नॅपकिन
-थ्री प्लाय फेस मास्क
इतर रेल्वेगाड्यांबाबत लवकरच निर्णय
‘कोरोनामुळे दोन वर्षांपासून बेडरोल देणे बंद करण्यात आले होते, परंतु आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये कंत्राटदारामार्फत डिस्पोजेबल बेडरोल पुरविण्यात येणार आहे. इतर रेल्वेगाड्यांत ही सुविधा देण्याबाबत उच्च स्तरावर निर्णय घेण्यात येईल.’
- कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.
...........