नागपूर : रेल्वेगाड्यांच्या इंजिनमध्ये बिघाड होण्याच्या घटनेत वाढ होत असून, शनिवारी सकाळी दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन कल्याण रेल्वेस्थानकावर ‘फेल’ झाल्यामुळे या गाडीला दीड तास विलंब झाला.
१२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री मुंबईकडे रवाना झाली. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचण्याची वेळ सकाळी ७.१५ वाजताची आहे. परंतु, कल्याण रेल्वेस्थानकावर पोहोचताच या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाला. लगेच या गाडीच्या इंजिनची दुरुस्ती करण्यास सुरुवात करण्यात आली. परंतु, त्यासाठी दीड तासाचा वेळ लागला. त्यामुळे प्रवाशांना गाडीतच बसून राहण्याची पाळी आली. त्यामुळे ही गाडी ८.४५ वाजण्याच्या दरम्यान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचली. अलीकडच्या काळात रेल्वेगाड्यांचे इंजिन बिघडण्याच्या घटनात वाढ झाली आहे. १० दिवसांपूर्वी विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये वर्धा रेल्वेस्थानकाजवळ बिघाड झाला होता, तर दोन दिवसांपूर्वी कळमनाच्या आऊटरकडील भागात अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यांच्या इंजिनची देखभाल करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
................