नागपूर : रेल्वे प्रवाशांची सुविधा आणि मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेहून जाणाऱ्या चार विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ दिली आहे. यामुळे या गाड्या त्यांच्या पूर्वीच्या निर्धरित तारखेपेक्षा अधिक काळ सेवा देणार आहेत.
रेल्वे विभागाने जाहीर केल्यानुसार, ०८२३७ कोरबा-अमृतसर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वे आता ३१ मार्चऐवजी २५ जून २०२१ पर्यंत चालविली जाणार आहे. ०८२३८ अमृतसर- बिलासपूर रेल्वेचा कालावधी २ एप्रिलवरून वाढवून २७ जूनपर्यंत करण्यात आला आहे. ०२२५१ यशवंतपूर-कोरबा ही रेल्वे २६ मार्चऐवजी २५ जूनपर्यंत आणि ०२२५२ कोरबा-यशवंतपूर ही २८ मार्चऐवजी २७ जूनपर्यंत चालविली जाईल. या सर्व रेल्वेगाड्यांमध्ये कोविड-१९ संबंधी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या सर्व रेल्वेमध्ये कन्फर्म तिकिटावरच प्रवासाला परवानगी दिली जाईल.
...
होळीसाठी विशेष रेल्वे नाही
दरवर्षी होळीच्या सणापूर्वी रेल्वे विभागाकडून विविध भागासाठी होळी विशेष रेल्वेगाड्या चालविल्या जातात. मात्र यावर्षी अशी कोणतीही अधिसूचना काढण्यात आलेली नाही.
राज्यातील राजकीय परिस्थितीसोबतच शहरातील वातावरणही बदलत आहे. कोरोनाचे संक्रमणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अलीकडेच लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतातील मजूरवर्गाला मागील वर्षासारखा अनुभव यायला लागला आहे. याचदरम्यान होळीचा सण जवळ आल्याने अनेक मजुरांनी गावाकडे परतण्याची तयारी सुरू केली आहे.
एनएचएआयच्या अधिकृत सूत्रानुसार, वेगवेगळ्या रस्ता बांधकामावर असलेल्या परप्रांतातील मजुरांनी मंगळवारी सायंकाळपासूनच (होळीच्या एक आठवडा आधीपासून) गावाकडे परतण्याची तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगडकडे जाणाऱ्या बसेस बंद आहेत. त्यामुळे एकमेव रेल्वेगाड्यांचा त्यांना आधार आहे. यामुळे आधीच विलंब झालेल्या रस्ता बांधकामाच्या प्रकल्पांना पुन्हा विलंब होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.