निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : असे म्हणतात की आलेल्या संकटाच्या वेळी जिंकतो तोच जो लढतो. कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीत अनेकांचे रोजगार गेले आहेत, पण काही या परिस्थितीचा मुकाबला करण्यास तयार झाले आहेत. यात महिलाही मागे नाहीत. रस्त्यावर ई-रिक्षा घेऊन फिरणाऱ्या दुर्गा मदनकर या त्यातीलच एक. टाळेबंदीत पतीचा रोजगार गेल्याने त्यांनी स्वत: उभे राहून कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे.दुर्गा पांडुरंग मदनकर या पारडी येथील रहिवासी. पती, मुलगा आणि त्या असे छोटेसे कुटुंब. त्यांचे पती खासगी वाहनचालक आहेत. तशा दुर्गा या १२ महिन्यापासून ई-रिक्षा चालवीत आहेत. पतीच्या तुटपुंज्या मिळकतीत हातभार लागावा म्हणून भाड्याने ई-रिक्षा आणून त्यांनी हे काम स्वीकारले आहे. दरम्यान कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यात १९ मार्चपासून टाळेबंदी करण्यात आली. या टाळेबंदीने एका झटक्यात पतीचा रोजगार हिरावला. या टाळेबंदीत ई-रिक्षासारख्या प्रवासी वाहनाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी दुर्गा यांनीच कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली.त्यांनी सांगितले की, टाळेबंदीच्या संपूर्ण काळात त्या ई-रिक्षा चालवीत आहेत. पूर्वी हजार-बाराशे कमाई व्हायची, पण ती आता पाचशे-सहाशेवर आली आहे. मात्र जे मिळेल ते महत्त्वाचे आहे. पोलीस थांबवितात, पण त्यात कारवाईपेक्षा कुतूहल अधिक असते. काळजी घेण्याचे आवाहन करीत असतात. पतीलाही याचे समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.सुरक्षेची घेते काळजीकोरोनाची भीती तर वाटते, पण पर्याय नसल्याने हे काम करीत आहे. मात्र हे करताना सुरक्षेची काळजी घेत असल्याचे दुर्गा यांनी सांगितले. प्रशासनाच्या नियमावलीनुसार अंतर राखून दोन सवारीच बसू देते. स्वत:ही सतत मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करीत असते. ही सुरक्षा घरी गेल्यावरही पाळते. वाहन स्वच्छ करण्यापासून आपलीही स्वच्छता घ्यावी लागते. मात्र संरक्षणासाठी हे जरुरीचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.