नागपुरात बंददरम्यानदेखील काँग्रेसमध्ये गटबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:23 AM2018-09-11T01:23:24+5:302018-09-11T01:24:37+5:30
राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप लावला. वनवे यांनी ठाकरे यांच्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. दुसरीकडे विकास ठाकरे यांनी आरोपांचे खंडन केले असून वनवे तर आंदोलनात कुठे दिसलेच नसल्याचे म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप लावला. वनवे यांनी ठाकरे यांच्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. दुसरीकडे विकास ठाकरे यांनी आरोपांचे खंडन केले असून वनवे तर आंदोलनात कुठे दिसलेच नसल्याचे म्हटले आहे.
‘भारत बंद’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे रामनगरहून ‘रॅली’ काढण्यात आली. यात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी खासदार मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अ.भा.काँग्रेस कमेटीच्या ‘एससी सेल’चे अध्यक्ष नितीन राऊत, माजी मंत्री राजेंद्र मुळक हे सहभागी झाले होते. या ‘रॅली’मध्ये सहभागी होण्यासाठी मीदेखील रामनगर येथे पोहोचलो. मात्र गोकुळपेठ येथे पोहोचल्यावर ठाकरे यांनी मला धक्का मारला. तसेच येथे कुणी बोलविले आहे व का आले आहात असा प्रश्न विचारला. येथून निघून जा, अन्यथा जीवे मारून टाकील, अशी धमकी ठाकरे यांनी दिली, असा आरोप वनवे यांनी लावला. यानंतर वनवे ‘रॅली’तून बाहेर पडले व अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उल्लेखनीय आहे की शहर काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरू आहे. एका बाजूला मुत्तेमवार-ठाकरे तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व त्यांचे समर्थक आहेत. चतुर्वेदी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, मात्र पक्षातील अंतर्गत राजकारणात त्यांच्या समर्थकांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. वनवे हे त्याच गटातील आहेत.
यशस्वी बंदमुळे विरोधी घाबरले
विकास ठाकरे यांना या आरोपांबाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोपांचे खंडन केले. सोमवारी वनवे कुठेही दिसलेच नाहीत. ‘भारत बंद’ नागपुरात यशस्वी झाला. त्यामुळे विरोधी घाबरले आहेत. भाजपच्या इशाºयावर असे तथ्यहीन आरोप लावले जात आहेत, असे ठाकरे म्हणाले. मी पश्चिम नागपुरातून विधानसभा निवडणूक लढलो आहे. त्यामुळेच राजकुमार कमनानी यांनी काढलेल्या ‘रॅली’त मी सहभागी झालो. वनवे यात सहभागीच झाले नव्हते. पक्षाचे इतरही वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. त्यांनादेखील विचारले जाऊ शकते, असा दावादेखील ठाकरे यांनी केला.