सुमेध वाघमारे
नागपूर : प्रसूतीपूर्वी कोरोना चाचणीची नवीन अट पॉझिटिव्ह आल्यास मेयो, मेडिकलमध्येच प्रसूती करण्याची जबरदस्ती, प्रसूतीपूर्वी आणि नंतर स्वत:ला आणि बाळाला कोरोनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यामुळे गर्भवती मातांवर मोठा ताण होता. अशा कठीण काळातही एप्रिल ते नोव्हेंबर या काळात नागपूर शहरातील रुग्णालयांमध्ये ३७,९३७ प्रसूती झाल्या. विशेष म्हणजे, यात २३,८८७ नॉर्मल प्रसूती होत्या.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला मार्च महिन्यापासून सुरुवात होताच शासकीयसह खासगी हॉस्पिटलमधील चित्रच बदलले. ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्वीचे उपचार सुरू होते त्यातील अनेकांनी प्रसूतीसाठी हात वर केले. ज्यांनी होकार दिला त्यांनी कोरोना चाचणीच्या निगेटिव्ह अहवालाची अट टाकली. काहींनी पॉझिटिव्ह मातेच्या प्रसूतीची रक्कम दुपटीने वाढविली. सुरुवातीला कन्टेन्मेंट झोनमधील गर्भवतींसाठी मेयो, मेडिकल या शासकीय रुग्णालयाशिवाय पर्यायच नव्हता. अशा अनेक अडचणीतून मार्ग काढत शहरात ३७,९३७ प्रसूती झाल्या. त्यातही एकूण प्रसूतीच्या तुलनेत ६२.९६ टक्के या नॉर्मल प्रसूती आहेत.
- मेयो, मेडिकलमध्येही ८,०५४ प्रसूती
मनपाच्या आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मागील सात महिन्याच्या काळात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे ८,०५४ प्रसूती झाल्या. मेयोमध्ये एकूण ३,११३ मधून १,४२६ सीझेरियन तर १,६८७ नॉर्मल प्रसूती झाल्या. मेडिकलमध्ये ४,९४१ मधून २,२०८ सीझेरियन तर २,७३३ नॉर्मल प्रसूती झाल्या.
- डागामध्ये ५,९२३ तर मनपामध्ये ७५ प्रसूती
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात कोरोनाच्या काळात ५,९२३ प्रसूती झाल्या. यात ३,११३ सीझेरियन तर २,८१० नॉर्मल प्रसूती होत्या. तर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली रुग्णालय मिळून केवळ ७५ प्रसूती झाल्या. इंदिरा गांधी रुग्णालयात एकूण १४ प्रसूतीमध्ये ८ सीझेरियन तर ६ नॉर्मल प्रसूती आहेत. पाचपावली रुग्णालयात एकूण ६१ प्रसूतीमधून ५३ सीझेरियन तर ८ नॉर्मल प्रसूती आहेत.
- खासगीमध्येही नॉर्मल प्रसूतीचा आकडा मोठा
शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये २३,८४८ प्रसूती झाल्या. यात ७,२३३ सीझेरियन तर
१६,६१५ नॉर्मल प्रसूती आहेत. यावरून कोरोनाच्या काळात बहुसंख्य हॉस्पिटलमध्ये नॉर्मल प्रसूतीकडे विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसून येते.
- कोरोनाचा आणि नॉर्मल प्रसूतीचा संबंध नाही
कोरोनाचा आणि नॉर्मल प्रसूतीचा संबंध नाही. परंतु ज्या गर्भवती पॉझिटिव्ह होत्या किंवा त्यांना कोविड होऊन गेलेला होता त्यांचे सीझेरियन करण्याचा अनेकांचा कल होता. कारण यांच्याकडून संसर्गाचा अधिक धोका असतो.
-डॉ. चैतन्य शेंबेकर
स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ