मोरेश्वर मानापुरे
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागात (एफडीए) पूर्व विदर्भासह नागपूर जिल्ह्यात भेसळीवर नियंत्रण ठेवणाऱ्या सहआयुक्तांसह (अन्न) सहायक आयुक्तांची (अन्न) दोन पदे रिक्त असल्यामुळे, सणासुदीत व्यापाऱ्यांना भेसळीसाठी रान मोकळे झाले आहे. पूर्व विदर्भाचा कार्यभार एका प्रभारी अधिकाऱ्यावर चालत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांअभावी कनिष्ठ सुस्तावल्याने व्यापाऱ्यावर धाडीच्या कारवाया कमी होत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत एफडीए गंभीर नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
पावसाळ्यात आणि कोरोना काळात अन्नपदार्थातील भेसळीमुळे आजाराला आमंत्रण देण्याची जास्त शक्यता असते. राज्य सरकार विदर्भातील महत्त्वाच्या शासकीय विभागातील रिक्त पदे भरण्यास नेहमीच कानाडोळा करीत असल्याचा अनुभव अन्न व औषध प्रशासन विभागाला सध्या येत आहे.
नागपूर विभागांतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कारवाया सहआयुक्तांच्या नियंत्रणाखाली होतात. या पदावर कार्यरत चंद्रकांत पवार ३१ मार्च २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा प्रभार नागपूर ग्रामीणचे सहायक आयुक्त शरद कोलते यांच्याकडे सोपविण्यात आला. याशिवाय सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे ३१ ऑगस्ट २०१९ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर कोलते यांच्याकडेच १ सप्टेंबर २०१९ पासून नागपूर शहर सहायक आयुक्तपदाचा प्रभार आला. सध्या शरद कोलते यांची ९ ऑगस्ट २०२१ ला अमरावती येथे बदली झाली आहे. तत्पूर्वी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी वर्धा येथील सहायक आयुक्त वाणे यांच्याकडे नागपूर विभागीय सहआयुक्त, शहर व ग्रामीण सहायक आयुक्तांचा प्रभार सोपविला आहे. याशिवाय ते वर्धेचे सहायक आयुक्त आहेतच. अर्थात त्यांच्यावर चार वरिष्ठ पदांची जबाबदारी आली आहे. त्यांना अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून काम करून घेणे कठीणच होणार आहे. रिक्त पदे भरण्यासाठी स्थानिक नेतेही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत म्हणून भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोण धडक कारवाई करणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर जिल्ह्यासाठी अपुरा स्टाफ
३५ लाख लोकसंख्येच्या नागपूर जिल्ह्यासाठी दहा अन्न सुरक्षा अधिकारी व एक प्रभारी सहायक आयुक्त असल्यामुळे अन्नपदार्थ असो वा खाद्यतेलातील भेसळ आणि तंबाखूविरोधी व सडकी सुपारी विक्रेत्यांवर धडक कारवाया होत नाहीत. त्यामुळेच बाजारात भेसळीचा धंदा फोफावला आहे.
कोरोना काळात अधिकाऱ्यांची अन्य विभागात नियुक्ती
यावर्षी मार्च, एप्रिल आणि मे या कोरोना काळात विभागातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात प्रतिनियुक्तीवर पाठविले होते. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचे बंधन आले होते. याशिवाय अन्नपदार्थांचे नमुने घेता आले नाही. त्यामुळे विभागाला कारवाईचे लक्ष्य पूर्ण करता आले नाही.
दोन सेवानिवृत्त, तर एकाची बदली
- सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार (सेवानिवृत्त) : ३१ मार्च २०२१
- सहायक आयुक्त (अन्न, शहर) मिलिंद देशपांडे (सेवानिवृत्त) : ३० ऑगस्ट २०१९
- सहायक आयुक्त (अन्न, ग्रामीण) शरद कोलते (बदली) : ९ ऑगस्ट २०२१