योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना, भारतीय जनता पक्षाकडून नवरात्रीत महाजनसंपर्क मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून एकाच वेळी शहरातील सर्व कार्यकर्ते घराबाहेर पडून घरोघरी जाऊन संपर्क साधतील. विशेष म्हणजे, केंद्र, राज्य पातळीवरील वरिष्ठ मंत्रीही यात सहभागी होत कार्यकर्त्यांसोबत गृहसंपर्क साधतील. विधानसभा निवडणूक घोषित होण्याअगोदर, तसेच प्रचारादरम्यान राज्यात इतर ठिकाणीही अशी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.
भाजपकडून लोकसभेच्या दरम्यान संपर्क मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, ती विधानसभा क्षेत्रनिहाय आयोजित करण्यात आली होती. लोकसभेत भाजपला अपेक्षित मते मिळू शकली नव्हती, तसेच विरोधकांनी संविधानावरून केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तरही देता आले नव्हते. हीच बाब लक्षात घेऊन केंद्रीय पातळीवरील निर्देशांनुसार नागपुरातून या महाजनसंपर्क मोहिमेची सुरुवात होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी एकाच वेळी शहरातील सुमारे १८ ते २० हजार कार्यकर्ते सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये घरोघरी जाऊन संपर्क साधतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही त्यात सहभागी होतील. गडकरी हे पूर्व नागपुरात जाऊन मतदारांच्या घरी संपर्क करण्याची शक्यता आहे.
कमकुवत बूथवर जास्त संपर्ककेंद्रीय पातळीवरून आलेल्या सूचनांनुसार भाजपचा प्रभाव जेथे कमी आहे किंवा जेथील बूथपातळीवरील क्षमता कमकुवत आहे, त्या भागांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते जास्त संपर्क साधतील. राज्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच महाजनसंपर्क मोहीम राबविण्यात येत असून, इतर ठिकाणीही ती राबविली जाईल, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
मतदार यादीचीही करणार चाचपणीलोकसभेत हजारो मतदारांची नावे मतदारयादीतून गहाळ झाल्याचा भाजपला फटका बसला होता. या मोहिमेदरम्यान भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी बूथनिहाय मतदारयादी सोबत ठेवणार आहेत. संबंधित घरातील सदस्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केले होते का की, त्यांचे नाव गहाळ झाले होते, याची चाचपणी करण्यात येणार आहे. ज्यांची नावे मतदारयादीत नसतील, त्यांची यादीच जिल्हा प्रशासनाला सोपविण्यात येणार आहे.