नागपूर : काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.शेतकरी विजय खोब्रागडे व वसंत इंचिलवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. याप्रकरणाची विभागीय सहकार सहनिबंधकांमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्याची याचिकाकर्त्यांची विनंती आहे. वाघाये २००२ ते २००५ पर्यंत बँकेचे प्रशासक होते. पाच सदस्यीय समितीने या काळातील लेखापरीक्षणाबाबत प्रतिकूल अहवाल दिला आहे.तो अहवाल सहनिबंधकांना सादर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी राज्य सरकार व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर २६ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.
सेवक वाघाये यांच्या काळात भंडारा बँकेत गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 4:29 AM