ठळक मुद्देदररोज चारशेवर पोलिसांवर केला जातो उपचार
नरेश डोंगरेआॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील ठिकठिकाणाहून हिवाळी बंदोबस्तासाठी आलेल्या तीन हजारांवर पोलिसांना नागपूरच्या थंडीचा तडाखा बसला आहे. गेल्या आठ दिवसात पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या डॉक्टरांनी ३१२० कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारचे उपचार केले आहेत.हिवाळी बंदोबस्तासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून दरवर्षी मोठ्या संख्येत महिला-पुरूष पोलीस कर्मचारी-अधिकारी नागपुरात येतात. यावर्षी बंदोबस्तासाठी बाहेरून आलेल्या पोलिसांची संख्या कमी आहे. मात्र, जे काही बाहेरून आले त्यांना नागपूरची थंडी थरथरवणारी ठरली आहे. भल्या सकाळी उठून रात्रीपर्यंत बंदोबस्तात तैनात राहावे लागत असल्यामुळे आणि आपले गाव सोडून आल्याने वातावरण तसेच खाण्यापिण्यात बदल झाल्याने अनेक पोलिसांना ताप, सर्दी, पडसे, खोकला, ओकाऱ्या, डोकेदुखी व घसादुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे बंदोबस्तावरील बरेचसे पोलीस हैराण आहेत. रोज सुमारे ४०० ते ५०० रुग्ण उपचार घेत आहेत.विशेष म्हणजे, बाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना दरवर्षीच्या तुलनेत यंदा पोलीस आयुक्तालयातून निवास आणि जेवणाची चांगली व्यवस्था करून देण्यात आली आहे. अवघ्या दहा रुपयात दोन्ही वेळेला पोटभर आणि गरम जेवण, अंथरायला गाद्या, पांघरायला ब्लँकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. आंघोळीला गरम पाण्याची व्यवस्था आहे. मात्र, एकाच वेळी सर्वांनाच कर्तव्यावर हजर राहावे लागत असल्याने जे आधी नंबर लावतील त्यांचे ठीक आहे. काही जणांना गैरसोयीचाही सामना करावा लागत आहे.९ डॉक्टरांसह ५५ कर्मचारीबंदोबस्तावरील पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यंदा आरोग्य सुविधांचेही चांगले नियोजन करण्यात आले आहे. ९ डॉक्टर, ९ पारिचारिका आणि ३७ कर्मचारी असे एकूण ५५ अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तांवरील पोलिसांच्या आरोग्यांची काळजी घेत आहेत. त्यांच्या मदतीला ६ अॅम्बुलन्स आहेत. त्यात वायरलेस सेटही आहेत. पोलीस अधिकारी असो अथवा कर्मचारी त्याला काही त्रास होत असल्याची माहिती कंट्रोल रूममधून मिळताच तेथे जाऊन वैद्यकीय पथके तातडीने उपचार करीत आहेत.परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश ओला आरोग्य सेवा-सुविधेवर विशेष नजर ठेवून आहेत. बंदोबस्तात तैनात असलेल्या अनेक पोलिसांनी कडाक्याच्या थंडीमुळे प्रकृती अस्वास्थ्याबद्दलची कुरबुर करतानाच तातडीने चांगले उपचार मिळत असल्याबद्दल लोकमतशी बोलताना समाधानही व्यक्त केले आहे.