नागपूर : घरफोडी करून दागिन्यांसह विदेशी चलन घेऊन पळ काढणाऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून आरोपींचा शोध लागला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
४ एप्रिल रोजी उज्वल नरेंद्र पांडे (३५, महालक्ष्मीनगर - २) हे घराला कुलूप लावून कुटुंबियांसह बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला व चार कपाटांमधून दागिने, अमेरिकन डॉलर्स, युरोपमधील काही देशांची नाणी, श्रीलंकन करंसी व रोख असा ७.८८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. पांडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून तसेच तांत्रिक तपासातून यात आयुष आशीष लखोटे (१९, रामबाग), मोहीत विनोद मेश्राम ( २०, न्यू कैलास नगर, अजनी) व एक अल्पवयीन मुलगा सहभागी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली व हेच आरोपी असल्याची खात्री पटल्यावर त्यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांनी या गुन्ह्यात एका दुचाकीचा वापर केला होता. आरोपींच्या ताब्यातून १० ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ८६ ग्रॅमचे चार मंगळसूत्र, १५ ग्रॅमच्या चार रिंग, तीन अंगठ्या, दुचाकी असा ७.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, दीप बने, माधव गुंडेकर, शैलेष ठवरे, आशीष तितरमारे, गणेश बोंद्रे, चंद्रशेखर कोरती, मनोज नेवारे, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, नागेश मोते, मुकेश कन्नाक, मंगेश मडाडी, नितेश कडू, हिमांशू पाटील, रुबिना यांच्या पथकाने ही कारवाई केली.