:मंगेश व्यवहारे
नागपूर : विधिमंडळाच्या अधिवेशनात आतापर्यंत ३५० सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबित झालेले पहिले सदस्य विदर्भवीर जांबूवंतराव धोटे होते. गोंधळ, गैरवर्तणूक, राजदंड पळविणे, कागदपत्र फाडणे, मुख्यमंत्र्यांना इजा करण्याचा प्रयत्न करणे, सभागृहात प्रेतयात्रा काढणे, विषारी औषधी व केरोसिन अंगावर घेणे आदी प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली आहे.
विधिमंडळातील नोंदीनुसार सर्वप्रथम १२ ऑगस्ट, १९६४ ला जांबूवंतराव धोटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. धोटेंनी माइक बंद असल्याच्या कारणावरून माइक तोडला होता. पेपरवेट फेकून मारला होता. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व कायमचे रद्द करण्यात आले होते. २०२१ मध्ये पिठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने भाजपच्या १२ सदस्यांचे निलंबन झाले होते, तर यंदा ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी अध्यक्षांविषयी अपशब्द बोलल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले.
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून सर्वाधिक सदस्यांचे निलंबन
महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावादाच्या प्रश्नावरून सर्वाधिक सदस्यांवर निलंबनाची कारवाई झाली. ऑगस्ट, १९६६च्या अधिवेशनात २० सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरच्या वर्षात एकाच अधिवेशनात दोन वेळा ४३-४३ सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
- १९७०च्या काळात जीवनावश्यक वस्तूच्या टंचाईवरून निलंबन
२२ मार्च, १९७३ ला दुष्काळ व टंचाईच्या मुद्यावरून झालेल्या गोंधळामुळे तब्बत २७ सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. १९७४ मध्ये याच कारणावरून झालेल्या गोंधळातून १७ आमदार व १९७५ मध्येही ५ आमदार निलंबित झाले होेते, तर १९८५ ला शासनाने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी योजना बंद केल्याने १२ आमदारांचे निलंबन झाले होते.
- मुख्यमंत्र्यांना शारीरिक इजा केल्याप्रकरणी निलंबन
१९९१च्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना शारीरिक इजा केल्याप्रकरणी सेनेच्या ३ आमदारांना निलंबित केले होते, तर १९८७च्या अधिवेशनात अध्यक्षांची परवानगी न घेता, फलक झळकवून गैरवर्तणूक केल्याप्रकरणी छगन भुजबळ यांना निलंबित केले होते. अध्यक्षांच्या टेबलावर हात आपटून कामकाजात अडथळा आणल्याने, १९९३ मध्ये ६ आमदार निलंबित केले होते. राजदंड पळवून नेल्याने, सभागृहात अंगावर केरोसिन ओतण्याचा प्रयत्न केल्याने २००५ मध्ये गुलाबराव गावंडे यांना निलंबित केले होते. याच वर्षात अध्यक्षाच्या दालनात उपाध्यक्षांना शिवीगाळ केल्याने ३ सदस्यांचे निलंबन झाले होते. २००६ मध्ये अध्यक्षांना पुस्तिका फेकून मारल्यामुळे ६ आमदारांचे निलंबन झाले होते. २०१० मध्ये राजदंड पळविल्याने संजय राठोड यांचे निलंबन झाले होते. राज्यपालांना धक्काबुक्की केल्याने ५ आमदारांचे निलंबन २०१४ मध्ये झाले होते.
- शपथविधी कार्यक्रमात मनसेचे ९ आमदार निलंबित
२००९ मध्ये शपथविधी कार्यक्रमात अनुचित वर्तन केल्याप्रकरणी मनसेचे ९ आमदार निलंबित झाले होते, तर रमाई आंबेडकरनगरातील गोळीबारप्रकरणी सभागृहात प्रेतयात्रा काढल्यामुळे समाजवादी व भाकपाचे ५ सदस्य निलंबित झाले होते.