नागपूर : १९६२ च्या भारत-चीन युद्धकाळात उखळी तोफांनी जखमी झालेल्या सैन्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रक्तदान केले होते. सैनिकांसाठी रक्ताचा तुटवडा पडल्याने देशभर दौरे करून त्यांनी जनजागृती केली होती. आज कोरोना संक्रमणाच्या काळात पडलेला रक्ताचा तुटवडा आणि ‘लोकमत’च्या महारक्तदान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे.
‘लोकमत रक्ताचे नाते’ या उपक्रमांतर्गत २ जुलैपासून राज्यभर पुढाकार घेऊन सामाजिक संस्था आणि जनतेच्या सहकार्याने ‘लोकमत’कडून रक्तदानाचा उपक्रम राबविला जात आहे. कोरोनामुळे देशभर रक्ताचा प्रचंड तुटवडा पडला आहे. जीवनमरणाचा हा विषय ओळखून लोकमतने हा देशव्यापी उपक्रम राबविला आहे. पंतप्रधानांसह अनेक महत्वाच्या नेत्यांनी यासाठी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक यावले यांनी राष्ट्रसंतांचे रक्तदानाप्रसंगीचे छायाचित्र लोकमतला उपलब्ध करून दिले आहे.
...
रक्तदानासाठी महाराजांचा पुढाकार
२० ऑक्टोंबर १९६२ चीनने भारतावर आक्रमण केले. भारतीय सेना निकराने लढली पण साधनाचा अभाव, प्रतिकूल परिस्थितीमुळे प्रचंड दमछाक झाली. तुकडोजी महाराजांनी देशाच्या अनेक भागात दौरे करुन तरुणांनी देश संरक्षणासाठी भारतीय सेनेमधे सामील होण्याचे आवाहन केले. युद्धामध्ये चीनच्या उखळी तोफांच्या बेसुमार माऱ्यामुळे भारतीय सैनिक मोठ्या संख्येने गंभीर जखमी झाले होते. रक्ताची नितांत आवश्यकता होती. देशात तुटवडा होता. महाराजांनी १ डिसेंबर १९६२ ला लोखंड बाजार, पायधुनी मुंबई येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखेद्वारे आयोजित रक्तदान शिबिरात प्रथम रक्तदान करून उद्घाटन केले. तत्कालीन आरोग्य उपमंत्री डॉ. कैलास उपस्थित असल्याची आठवणही यावले यांनी संकलित केली आहे.