नागपूर : मागील काही दिवसापासून दैनंदिन रुग्णवाढीच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी राहत होती. परंतु शनिवारी ३७६ रुग्णांची भर पडली असताना एवढेच रुग्ण बरे झाले. आज ७ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ३,७९२ तर रुग्णांची संख्या १,१६,९११ वर पोहचली. या आठवड्यात २,६९३ नव्या रुग्णांची व ३२ मृत्यूची नोंद झाली.
कोरोना रुग्णसंख्येचा वेग वाढत नसला तरी त्यात घटही होत नसल्याचे मागील आठवड्याच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. विशेष म्हणजे, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णांची संख्या दोनदा ५०० वर गेली होती. तर या आठवड्यात केवळ एकदाच रुग्णसंख्येने हा आकडा गाठला. आज ४,८०० संशयित रुग्णांची आरटीपीसीआर, तर ७६२ संशयित रुग्णांची रॅपिड अॅन्टिजेन अशा एकूण ५,५६२ संशयितांची तपासणी झाली. यात आरटीपीसीआर चाचणीतून ३३१ तर ॲन्टिजेन चाचणीतून ४५ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. यात शहरातील ३१७, ग्रामीणमधील ५६ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे.
- शहरात १ तर, ग्रामीणमध्ये ३ मृत्यू
शहरात आज १, ग्रामीणमध्ये ३ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत शहरात २,५८६, ग्रामीणमध्ये ६५९ तर जिल्हाबाहेरील ५४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. नागपूर जिल्ह्यात १,०७,१४९ रुग्ण बरे झाले आहेत. ५,९७० रुग्ण उपचाराखाली आहेत.
::कोरोनाची आजची स्थिती
-दैनिक संशयित : ५,५६२
-बाधित रुग्ण : १,१६,९११
_-बरे झालेले : १,०७,१४९
- उपचार घेत असलेले रुग्ण : ५,९७०
- मृत्यू : ३,७९२