लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छता आणि अतिक्रमणासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशासनुसार धडक कारवाई सुरू आहे. याच अंतर्गत शुक्रवारी चक्क रविभवनात उपद्रव शोध पथकाने धडक दिली. रविभवन परिसरात आढळलेली अस्वच्छता आणि दुर्गंधीसाठी व्यवस्थापकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या पथकाने ही कारवाई केली. रविभवन परिसरात मनपाचे उपद्रव शोध पथक पोहचले असता त्यांना ठिकठिकाणी अस्वच्छता आढळून आली. कचरापेटी असतानाही त्याच्याबाहेर कचरा पडलेला होता. प्लास्टिकच्या बॉटल्स, झाडांचा कचरा ठिकठिकाणी पडलेला होता. पाण्याच्या फ्रीजजवळही अस्वच्छता आढळली. शासकीय इमारतींच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन वेळोवेळी केले असतानाही रविभवन परिसरात आढळलेली अस्वच्छता पाहून उपद्रव शोध पथकाने मनपाच्या धोरणानुसार रविभवन व्यवस्थापकांवर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.कुत्र्यांमुळे अस्वच्छता चव्हाट्यावर८ तारखेला रविवार होता. नंतर होळीची सुटी आली. सुटीनंतर अनेक कर्मचारी परतले नाहीत. काही आले तरी स्वच्छतेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, रविभवनमध्ये थांबणाऱ्यांपैकी कुणीतरी येथेच्छ मासांहाराची पार्टी केली. सर्व कचरा कचरा पेटीत आणून टाकला. कचऱ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. याचवेळी कुत्र्यांनी कचरापेटी अस्तव्यस्त केली आणि रविभवनातील ही अस्वच्छता चव्हाट्यावर आली.