नागपूर : महापालिकेतील चार हजारांहून अधिक कर्मचारी व शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची ४० कोटींहून अधिक असलेली थकबाकी १२ हप्त्यात दिली जाणार आहे. सप्टेबरच्या ऑक्टोबर महिन्यात मिळणाऱ्या वेतनापासून थकबाकी मिळणार आहे. सणासुदीच्या दिवसात थकबाकी मिळणार असल्याने कमर्चाऱ्यांचा दसरा, दिवाळी आनंदात जाणार आहे. राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्पाईज असोसिएशनने थकबाकी मिळावी यासाठी वेळोवेळी आंदोलन केले होते. अखेर या आंदोलनाला यश मिळाले आहे.
महापालिकेतील नियमित कर्मचारी व शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील ही थकबाकी दिली जाणार आहे. यासंदर्भात मनपाचे वित्त अधिकारी सदाशिव शेळके यांनी सर्व विभाग प्रमुखांना परिपत्रक जारी केले आहे.
महापालिकेत कार्यरत नियमित कर्मचारी व शिक्षकांना सातव्या वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आला आहे. यासंदर्भात ८ जानेवारी २०२१ रोजी वित्त विभागाने परिपत्रक जारी केले होती. शासनाने १ सप्टेंबर २०१९ पासून वेतन आयोगाची थकबाकी देण्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार चार हप्ते देण्यात आले. परंतु उर्वरित थकबाकी मिळाली नव्हती. यासाठी कर्मचारी संघटनेने प्रशासनाकडे ही मागणी लावून धरली.
आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे थकबाकी देण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी थकबाकी देण्याला मंजुरी दिली. त्यानुसार सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ अशा १२ महिन्यात ही थकबाकी मिळणार असल्याची माहिती राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्पाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे व कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे यांनी दिली