नागपूर : दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार, जनता देखील हे बघत आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय, पण तो अर्ज कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचे सरकार आहे. खोके सरकार गद्दारी पुढे नेत आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी नागपुरात केली.
शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक कापसे यांनी आयोजित केलेल्या ताना पोळा कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे शनिवारी दुपारी नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुंबई मनपात बदल्याचे सरकार झाले आहे. त्यांनी परवानगी दिलेली नाही, तरी देखील शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे. जनता देखील हे बघत आली आहे. दसरा मेळावा हायजॅक वैगेरे केलेला नाही. या गद्दारांना निमित्त हवं होतं, यांच्याकडून जे नाट्य चाललं ते लोकांना नकोय. माझ्या ज्या यात्रा चालल्या त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय.
खोके सरकारच्या मागे कोण होतं ते आता पुढे यायला लागले आहे. हे खोके सरकार किती दिवस टिकेल याबाबतही शंका आहे,अशी टीका त्यांनी केली. ओरिजनल शिवसेना कुणाची हे तुम्हाला माहित आहे. आणि जे गद्दार आहे. आणि जनता आमच्या सोबत आहे आणि सोबत राहणार, असा दावाही त्यांनी केला. किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावर प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले.
'शिवसेनेची भूमिका कायम'संभाजी ब्रिगेडची युतीच्या घोषणेबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेनं कुठेही भूमिका सोडली नाही, शिवसेनेची भूमिका कायम आहे. ज्यांना ज्यांना आमचं हिंदुत्व मान्य असेल ते सोबत येतील. ज्यांना आमची भूमिका मान्य असेल ते सोबत येतील.
'सत्ताधारी निर्लज्जपणे विधानभवनाच्या पायऱ्यावर'परवा सत्ताधारी पक्ष निर्लज्जपणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर होते. सत्ताधारी पक्षाला आपण कधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बघीतलं आहे का. जनतेला माहित आहे की हे खोके सरकार आहे.आमचा एकच प्रश्न आहे, की आम्ही काय कमी दिलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा सवाल त्यांनी बंडखोर आमदारांना केला.