नागपूर : वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. आजाराला अनेक धोकादायक घटक कारणीभूत असले तरी एका निरीक्षणात घरातील धूळ हेसुद्धा कारण ठरले आहे. या धुळीमुळे ५० ते ६० टक्के रुग्णांना दमा झाल्याचे समोर आले आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळेही या आजाराचे रुग्ण वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो, त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवदेनशील, प्रभावित होणारी आणि नाजूक असते. यामुळे धूळ, धुराच्या संपर्कात येताच ती आंकुचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येते. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही, यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. ढगाळ वातावरणामुळे अस्थमाच्या रुग्णांना जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. यामुळे वेळीच काळजी घेण्याचा सल्ला श्वसनरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
-बालकांमध्ये अस्थमा
शहरातील वाढती बांधकामे, घरातील ओल लागलेल्या भिंती, व्हेंटिलेशनचा अभाव, हवेतील प्रदूषण, वातावरणातील बदल व बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात फुफ्फुसाचे आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी ५ ते ११ वयोगटातील बालकांमध्ये दम्याचे विकार वाढत आहे. भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा असल्याचे आढळून आले आहे.
-अशी घ्यावी काळजी
दमा आजार असलेल्यांनी औषधी वेळेवर घ्यावे. बेकरीचे पदार्थ, थंड पाणी, रासायनिक पदार्थ असलेले हबाबंद पदार्थ टाळावे. फळे व घरचा ताजा आहार घ्यावा. याशिवाय गार हवेत झोपणे, थंड वारा अंगावर घेणे, गोड खाल्ल्यानंतर पाणी घेणे, दुपारी जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. धूळ व प्रदूषणापासून दूर रहावे.
-कोट... (फोटो घ्यावा)
दम्याचे अचूक निदान शक्य आहे आणि त्यावर नियंत्रण मिळविणेही शक्य आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे व धुळीमुळे दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. यामुळे घरामध्ये धूळ साठेल असे कारपेट्स ठेवू नका. घर सफाईच्यावेळी धूळ उडणार नाही, अशा पद्धतीने साफसफाई करा. घरात धूर करण्यापूर्वी म्हणजे, उदबत्ती, कासव छाप अगरबत्ती जाळण्यापूर्वी विचार करा. फुफ्फुस क्षमता चाचणीने निदान पक्के करा. डॉक्टरांनी दिलेले औषधी नियमित घ्या. ज्या पदार्थांची अॅलर्जी आहे ते पदार्थ टाळा.
-डॉ. सुहास कानफाडे, छातीरोगतज्ज्ञ