नागपूर : उपराजधानीचा विस्तार आणि वाढत्या औद्योगिकरणासह प्रदूषणातही तीव्रतेने वाढ होत आहे. कार्बन, नायट्रोजनचे प्रदूषण वाढत आहेच; पण नागपूरकरांसाठी खरी डोकेदुखी धूलिकणांनी वाढविली आहे. १० मायक्रॉनखालील पार्टीकुलेट मॅटर (पीएम-१०) आणि २.५ मायक्रॉन आकाराचे पीएम-२.५ या अतिसूक्ष्म कणांनी लोकांच्या आरोग्याचा धोका वाढविला आहे. हे धूलिकण स्वतः धोकादायक आहेतच; पण ते विषारी वायू आणि प्रदूषणाचे वाहकही आहेत.
वायू प्रदूषणासाठी अनेक स्त्रोत कारणीभूत ठरतात. त्यात उद्योग, बांधकाम, रस्त्यावर धावणारी वाहने, निवासी परिसरात कचरा जाळण्याचा प्रकार आदींद्वारे प्रदूषणाचा विळखा पडतो. नागपूर शहरात लहान, मध्यम व मोठे जवळपास २१३ उद्योगांची नोंद आहे. शिवाय शहराला लागून असलेले ४८५६ मेगावॅटचे औष्णिक वीज केंद्र हे नागपूर व आसपासच्या भागात प्रदूषणाचे सर्वात भीषण कारण ठरले आहे.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने धूलिकणांच्या प्रदूषणाबाबत कोरोनानंतर सर्वेक्षण केले होते. एमआयडीसी हिंगणा, मस्कासाथ, इतवारी, औद्योगिक बाजारपेठ तसेच निवासी क्षेत्रातही हे सर्वेक्षण केले होते. त्यात धूलिकण प्रदूषणाची धक्कादायक स्थिती दिसून आली होती. या धूलिकणांमुळे लोकांच्या आरोग्याचा धोका अनेक पटीने वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते थंडीच्या काळात तापमान खाली घसरलेले असते. वातावरणात दवबिंदू पसरलेले असतात. धूलिकणांसह वाहत असलेले प्रदूषित घटक या दवबिंदूंना चिकटतात व वातावरणात वाहत असतात.
असरचे नागपूर शहरातील सर्वेक्षण
- नागपूर शहरात दरवर्षी पीएम-१० चे तब्बल १०५ गिगाच्यावर उत्सर्जन होते. हे प्रमाण चंद्रपूर व अमरावतीपेक्षा अधिक आहे.
- औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात पीएम- १० चे उत्सर्जन ३४ टक्क्यांनी अधिक आहे.
- त्यापाठोपाठ खराब रस्त्यावरून उडणारी धूळ पीएम-१० प्रदूषणाचे दुसरे मोठे कारण आहे. हे प्रमाण २१ टक्के आहे.
- याशिवाय असंघटित क्षेत्रातून १६ टक्के, बांधकाम क्षेत्रातून ९ टक्के, मनपाद्वारे घनकचरा जाळल्याने ५ टक्के पीएम-१० ची भर
- निवासी क्षेत्रातूनही धूलिकणांचे प्रदूषण वाढले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये चुलीवर स्वयंपाकाने ७ टक्के तर रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांमुळे ४ टक्के धूलिकणांचे उत्सर्जन होते.
नीरीने केलेले सर्वेक्षण
- औष्णिक वीज केंद्र व विकास प्रकल्पांच्या बांधकामामुळे धूलिकणांचे प्रदूषण धोकादायक स्तरावर वाढले आहे.
- शहरात धावणारी वाहनांमुळे आणि निवासी क्षेत्रातही पीएम-१० व पीएम २.५ प्रदूषणाचा स्तर अधिक आहे.
- पीएम-१० औद्योगिक क्षेत्रात १४.४ टक्के, बाजारपेठेत ४७.२ टक्के, निवासी क्षेत्रात ५२.१ टक्के एवढे आहे.
- एप्रिल ते जून व नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात धूलिकण प्रदूषण सर्वाधिक असते.
- पीएम-२.५ चा स्तर इतर क्षेत्रापेक्षा निवासी क्षेत्रात ११.५ टक्के अधिक आहे.
- नोव्हेंबर ते फेब्रुवारी ते मेपर्यंत पीएम-१० व पीएम २.५ च्या प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक असतो.