- प्रथमच दिसले नाही हुल्लडबाज रस्तोरस्ती : पोलिसही दिसले कर्तव्यावर निवांत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुरा ना मानो होली है... असा गजर करत वितुष्ट, ताणतणाव विसरत रंगांच्या प्रवाहात मिसळून जात धुळवड साजरी करणे ही प्रत्येक भारतीयांची परंपरा यंदा अतिशय शांततेत पार पडली. स्वाभाविकच कोरोनाची दहशत याला कारणीभूत होती आणि जोडीला शासनाच्या कठोर निर्देशांची धास्ती. धुळवड साजरीच झाली नाही, असेही नाही. मात्र, संयमाचा आधार घेत गुपचूप रंगोत्सव साजरा करण्यालाच नागरिकांनी पसंती दिली. त्यामुळे दरवर्षी डोळ्यात अंजन घालून कर्तव्य बजावणारे पाेलिसही यंदा निवांत दिसून येत होते.
२०२० मध्ये होळी-धुळवड पार पडल्यानंतर कोरोनाचा प्रकोप वाढला होता आणि टाळेबंदी लागू झाली होती. त्यामुळे यंदा साजरा झालेला रंगोत्सव कोरोना काळातील पहिला रंगोत्सव ठरला आणि कोरोना संसर्गाचा प्रभाव व भीती नागरिकांमध्ये पदोपदी जाणवत होती. होलिकादहनाच्या रात्रीपासूनच शहरात संचारबंदी लागू झाली होती आणि धुळवडीला सोमवारी दिवसभर ही संचारबंदी लागू असल्याने सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली होती. दरवर्षी रंग विक्रीचे, पिचकाऱ्या, डिझायनर फेस्टिव्हल मास्क आदींची दुकाने धुळवडीला सुरू असतात. मात्र, यंदा ही सर्व दुकाने बंद होती. साधी किराणा दुकानेही बंद असल्याने म्हणावा तसा उत्साह नव्हताच. शिवाय, दरवर्षी धुळवडीला ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यंदा अशा कार्यक्रमांना आधीच बंदी घातली गेली होती. त्याचा परिणाम शहरात कुठेच रंगोत्सवाचा जाहीर कार्यक्रम नव्हता. अनेकांनी घरोघरी आपसातच धुळवडीचा आनंद घेतला. बहुतांश लोकांनी घराबाहेर न पडण्याचाच निर्णय घेतला. दरवर्षी धुळवडीला मद्य-भांग घेऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांची प्रचंड रेलचेल असते. पोंग्यांचे मोठमोठे आवाज, घोषणा आदींचा प्रकोप असतो. यंदा तसे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे पोलिसांनाही कर्तव्यावर असताना फारशी दगदग करावी लागली नसल्याचेच दिसून येत होते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत शहरात सर्वत्र शांतता दिसून येत होती.
-------------
ट्रिपल सीट, विना मास्क
शांततेत रंगोत्सव साजरा होत असतानाही काही नागरिकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचेच दिसून येत होते. सकाळच्या सुमारास जरा शांतता दिसून येत असली तरी, दुपारी ११ वाजतानंतर अनेक जण बेपर्वा होऊन बाईकवर फिरत होते. अनेक जण वाहनावर ट्रिपलसीट फिरत होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता. अनेक जण बिनधास्त आलिंगन देत होते आणि रंग लावत होते.
---------------
पोलिसांची टेहळणी कुठेच नव्हती
धुळवडीचा दिवस आणि कोरोना निर्बंध व टाळेबंदी म्हणून पोलिसांचा दंडुका सगळ्यांवर बसणार, या धास्तीने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. मात्र, दुपारपर्यंत पोलिसांची टेहळणी कुठेच दिसत नसल्याने दुपारनंतर नागरिक बिनधास्त झाले होते. कानोकानी रस्ता मोकळा आहे, अशी माहिती मिळताच काहींनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली होती. मात्र, सर्वत्र दुकाने बंद असल्याने त्यांचा निरुत्साह झाला. काही विशिष्ट चौकातच पोलिसांचा पहारा दिसून येत होता. मात्र, पोलीस कुणालाही अडवत नव्हते. सगळे सुरळीत सुरू असल्यानेही कदाचित पोलीस निवांत होते.
-------
बच्चा पार्टींची होळी घरातच
धुळवडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बच्चा पार्टींची विशेष काळजी घेतल्याचे दिसून येत होते. मुलांचा हिरमोड होऊ नये आणि घराबाहेर पडू नये म्हणून पालकांनी मुलांसाठी घरच्या घरीच गुलाल, रंग व बादलीमध्ये पाण्याचे आयोजन केले. घरातल्या व शेजारच्या मुलांनाच आपापसात रंग खेळण्यासाठी सज्जता होती.
--------------
यंदा नाश्त्याला ना
धुळवडीला घरोघरी छोले-भटुऱ्याच्या नाश्त्याची तयारी असते. मात्र, यंदा कुणीच कुणाच्या घरी जाणार नाही, याची शाश्वती होती. त्याच पार्श्वभूमीवर कुणीच कुणाला नाश्त्यासाठी आमंत्रित केले नव्हते. आपापल्या घरीच पुरणपोळीचा आस्वाद घेण्यावर अनेकांनी भर दिला.
------------
महिला मंडळांचा रंगोत्सव बेरंग
सकाळी पुरुषवर्गाचा रंगोत्सव साजरा झाल्यानंतर सकाळची कामे आटोपून महिला मंडळ दुपारच्या वेळी सक्रिय होत असते. मात्र, यंदा असे चित्र कुठेही दिसत नव्हते. महिला मंडळांचा रंगोत्सव यंदा घरातच साजरा झाला.
.................