बुटीबोरी येथे आयोजन : सेवालय मित्रमंडळाचा उपक्रम बुटीबोरी : सेवालय मित्रमंडळाच्यावतीने बुटीबोरी येथे ‘एचआयव्ही’ बाधित अनाथ मुलांच्या नृत्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात या मृत्युंजय बालकांनी आकर्षक नृत्य सादर करून अतिथींसह उपस्थितांची मने जिंकली. सदर कार्यक्रम बुटीबोरी येथील राजवाडा सभागृहात पार पडला. कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा बडेजाव करण्यात आला नव्हता. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन एचआयव्ही बाधित अनाथ दिव्यांग दादाराव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. सेवालय संस्थेला सेवालय मित्रमंडळाच्यावतीने १ लाख २१ हजार तुळशीची रोपटी व वृंदावन भेट देण्यात आली. रवी बापट यांनी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात येणाऱ्या हसेगाव येथे ‘हॅपी इंडियन व्हिलेज’ची स्थापना केली. या संदर्भात रवी बापट यांनी सांगितले की, राज्यात १७ हजार तर देशात २१ लाख मुले एचआयव्ही बाधित आहेत. ही संस्था सुरू करताना मला आनंद झाला. ज्या दिवशी या देशात एकही मुलगा एचआयव्ही बाधित राहणार नाही, त्या दिवशी मला सर्वाधिक आनंद होईल, असेही बापट यांनी यावेळी सांगितले. स्नेहा शिंदे यांनी या एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना नृत्यकला शिकविली. मुलांनी त्या नृत्यकलेचे दर्शन व्यासपीठावर घडविले. या मुलांनी ‘काठी न घोंगड घेऊ द्या की रं’, ‘नाचतो जोगाइ’, यासह अन्य मराठी व हिंदी गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्नेहा शिंदे यांचेही संस्थेच्यावतीने स्वागत करण्यात आले. संचालन महेश अवचट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नरेश अवचट, देवेंद्र गणवीर, चैतन्य देशपांडे, आशिष मोरे, हितेश जाधव, सारिका अवचट, प्रिया अवचट, विजय सोहकर, राजेश नासरे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
मृत्युंजय बालकांचा नृत्याविष्कार
By admin | Published: May 01, 2017 1:16 AM