मोरेश्वर मानापुरे
नागपूर : शेतकाऱ्यांच्या शेतीमालाला चांगला दर मिळावा, शेतीमालाच्या आवकेपासून ते दरापर्यंतची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या हेतूने सरकारने राज्यातील बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन लिलाव पद्धत सुरू केली. ही पद्धत शेतकरी, व्यापारी आणि आडतियांना समजत नाही, असे ग्राह्य धरून या पद्धतीकडे कळमना बाजार समितीने कानाडोळा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे.
समितीच्या आवारात ई-लिलाव पद्धतीची चौकशी केली असता ही पद्धत आम्हाला माहीत नसल्याचे काही शेतकरी म्हणाले. शेतीमाल प्रत्यक्ष पाहल्यानंतर आणि सात ते आठ खरेदीदार जागेवर असल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने मिळालेल्या दरावर शेतकरी समाधानी असतात, असे काही व्यापाऱ्यांचे मत आहे. शिवाय कळमन्यातील प्रत्येक बाजारातील आडतिया ई-लिलाव पद्धतीला अनुकूल नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पुढील काही वर्षे कळमन्यात ई-लिलाव पद्धत सुरू होण्याची काहीच शक्यता नाही. ऑनलाईन पद्धतीने शेतीमालाचा लिलाव करण्यासाठी केंद्र सरकारने ३० लाख रुपयांची यंत्रणा समितीत बसविली आहे. पण ती धुळखात आहे.
एका क्लिकवर कळतात विविध वस्तूंचे दरराज्यात ३०५ बाजार समित्या कार्यरत आहेत. कांद्यापासून पालेभाज्यापर्यंत जवळपास ३५० वस्तूंचे दर एका क्लिकवर ऑनलाइन लिलाव पद्धतीमुळे समजू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळून त्यांना फायदाच होतो आणि व्यवहारात पारदर्शकता आल्यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आळा बसतो. ऑनलाईन लिलाव पद्धतीने शेतीमालाला नेमक्या कोणत्या बाजार समितीमध्ये चांगला दर मिळाला, याची माहिती एकाच ठिकाणी शेतकरी पाहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि चांगला दर मिळेल, तेथेच शेतीमालाची विक्री करणे शेतकऱ्यांना शक्य होते. त्यानंतरही ऑनलाईन लिलाव पद्धतीचा स्वीकार कळमना समितीने अद्याप केलेला नाही.
ऑनलाइन लिलाव शेतकरी व व्यापाऱ्यांना कळलाच नाहीऑनलाइन लिलाव पद्धतीने बाजार समितीच्या गेटवर कोणत्या शेतीमालाची किती आवक झाली, कोणत्या शेतकऱ्याचा किती शेतीमाल आहे, त्याचा खरेदीदार, एजंट अथवा व्यापारी कोण आहे, तसेच लिलावात काय दर मिळाला आहे, कोणत्या व्यापाऱ्याने बोली लावली आदी माहिती ऑनलाइन उपलब्ध होते. सरकारने या संदर्भात कार्यशाळा घेतलेली नाही. त्यामुळे व्यापारी, आडतिया आणि शेतकऱ्यांना ही पद्धतच अजूनही कळलेली नाही.अतुल सेनाड, अध्यक्ष, कळमना धान्य बाजार आडतिया असोसिएशन.