मोरेश्वर मानापुरे, नागपूर: मिहान परिसरात शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्याकरिता मनपाने १५ जुलैपासून दहा नवीन इलेक्ट्रिक बससह ई-बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली. हा निर्णय असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) आणि महामेट्रोच्या शिफारशीनुसार मनपाने घेतला आहे.
या विषयावर एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे आणि महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक महेश मोरोने, मनपाचे वाहतूक व्यवस्थापक संजय राठोड यांच्या उपस्थितीत फीडर बस सेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. संजय राठोड यांनी १५ जुलैपासून दहा नवीन ई-बस सेवा सुरू करण्यात येणार असून याची चाचणी १० जुलैपासून सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे मिहान परिसरातील सर्व स्टेकहोल्डर्स आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्ययांना त्यांच्या ठिकाणांपर्यंत सहजपणे जाता येईल.
महेश मोराेने यांनी मेट्रोद्वारे ई-बससाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे वैयक्तिक वाहनांचा वापर कमी होईल. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यास आणि जागतिक नकाशावर मिहानचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी), मेट्रोचे अधिकारी आणि मिहानच्या भागधारकांनी या उपक्रमासंदर्भातील शिफारसींचे पत्र औपचारिकपणे मनपाकडे सुपूर्द केले. बैठक एआयडीने बोलविली होती. यामध्ये मनपा व महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसह गिरधारी मंत्री, राहुल सिंग, राहुल कडु, सुनील नरवारे, अभिषेक गाजरे, प्रशांत साठे, मेजर कौशल नासरे, उज्ज्वल बांबेल, वैभव शिंपी, कॅप्टन विशाल बांगरे, दिशा दुधे, शुभम ताकसांडे, रवींद्र पागे, संजय दीक्षित, शुभम गुप्ता, अंकित नायक, पंकज भोकरे, विजय फडणवीस उपस्थित होते.