नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक आणि गतीने पंचनामे व्हावे, यासाठी नागपूर विभागात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर ‘ई-पंचनामे’ पद्धती राबविली जात आहे. देशात व राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. ई-पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना अविलंब मदत देणे शक्य होणार आहे. नुकसानीचे पंचनामे येत्या ५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवारी दिली.
राज्यभरात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने बिदरी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांना ‘ई-पंचनामे’ या उपक्रमाची माहिती दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक व पशुधनाचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे तातडीने व्हावे, शासनाकडून मिळणाऱ्या सर्व प्रक्रिया पारदर्शी व गतिमान करण्यासाठी विभागात ई-पंचनामे हा अभिनव प्रयोग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर २०२२ पासून यासंदर्भात मोबाइल ॲप्लिकेशन व सॉफ्टवेअर तयार करण्यास सुरुवात झाली. संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्य शासनाच्या महारिमोट सेंसिंग विभाग (एमसॅक) आणि महसूल व मदत व पुनर्वसन विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या ॲप्लिकेशनचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्यात आल्याचे बिदरी यांनी सांगितले.
असा होतो ई-पंचनामा
आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वत: तलाठी शेतकऱ्याच्या बांधावर जातात. तेथील छायाचित्र घेऊन ॲप्लिकेशनवर अपलोड करतात. ॲप्लिकेशनवर आधीच भरण्यात आलेल्या मंडळनिहाय सर्व्हे व गट क्रमांकनिहाय नुकसानीची ही माहिती तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांद्वारे भरण्यात येते. त्याची शेतकऱ्यांकडून आधीच ई-पीक पाहणीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीशी पडताळणी होते. नंतर तहसीलदारांकडून तपासून विभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविली जाते. नंतर ती राज्य शासनाकडे पाठविली जाते. जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा होईल, असे बिदरी यांनी सांगितले.
३० हजार ५९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
नागपूर विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास ३० हजार ५९९ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून, यासंदर्भात ५२ टक्क्यांपर्यंत पंचनामे पूर्ण झाले आहेत. या कामास गती देऊन महसूल सप्ताहातच ५ ऑगस्टपर्यंत उर्वरित सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्ह्यांना देण्यात आले आहे.
मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
पीक पेऱ्याची माहिती आधीच ई- पीक पाहणीमध्ये अपलोड केली असल्याने नुकसानीचे छायाचित्रे, शेतकऱ्यांचे संमतीपत्र आदी या अॅप्लिकेशनवर अपलोड केले जाईल. ई-पंचनामाचे अॅप्लिकेशन तयार करताना जियोटॅगींग, उपग्रह नकाशे, झालेली अतिवृष्टी आदींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळे नुकसानाची व्याप्ती लक्षात घेऊन शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा होणार आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक, पशुधन आदींचे होणारे नुकसान व त्याचे पंचनामे होऊन शासनाकडून मिळणारा निधी ही सर्व प्रक्रिया पारदर्शी व गतिमान करण्यासाठी नागपूर विभागात 'ई- पंचनामा' हा प्रायोगिक व अभिनव प्रयोग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकसानाचे पंचनामे येत्या ५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येतील.
- विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त, नागपूर