लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने सरकारने आंतरजिल्हा प्रवासबंदी केली आहे. मात्र, ज्यांना अत्यावश्यक काम आहे, त्यांना पोलिसांकडून ई-पास दिला जाणार आहे. या पासच्या आधारे संबंधित व्यक्ती कुठेही प्रवास करू शकतो.
कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलिसांनी शहर आणि जिल्ह्याच्या सीमांवर कडक नाकेबंदी केली आहे. त्यामुळे एका शहरातील व्यक्ती दुसऱ्या शहरात जाऊ शकत नाही. मात्र, ज्यांना लग्न, उपचार किंवा तसेच कोणते निकडीचे काम आहे, अशी व्यक्ती अथवा कुटुंब कुठेही प्रवासाला जाऊ-येऊ शकतात. त्यासाठी त्यांना अत्यावश्यक कामाचा पुरावा देऊन ई-पास काढावा लागेल. हा पास ‘कोविड१९डॉटमहापोलीसडॉटईन (इंग्रजीत) या पोर्टलवर अर्ज करून मिळू शकते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करून त्यात आवश्यक माहिती भरणे अनिवार्य आहे. ज्यांना ई-पास मिळविण्याचे तांत्रिक ज्ञान नाही किंवा साधन उपलब्ध नाही, असे व्यक्ती ते राहत असलेल्या पोलीस ठाण्यात जाऊन तेथून हा अर्ज भरून घेऊ शकतात.